Pimpri : अवघ्या सहा वर्षाच्या सात्विकने केला महाराष्ट्रातील अवघड लिंगाणा सुळका सर

एमपीसी न्यूज- लिंगाणा म्हणजे काळजात धडकी भरवणारा महाराष्ट्रातील एक अभेद्य सुळका. लिंगाणा सुळका सर करायचं हे प्रत्येक सह्यभटक्याचे स्वप्नं असत, पण लिंगाणा सर करणे येड्या गबाळ्याचे काम नाही. त्यासाठी तुमच्याकडे अंगात जिगर अन उरात जिद्द असावीच लागते. अन हे असल्यास वय हा मुद्दा गौण ठरतो. असाच बा रायगडचा सर्वात लहान मावळ सात्विक याने अवघ्या सहाव्या वर्षी 3100 फुट उंची असलेल्या गगनाला भिडलेल्या लिंगाण्याची यशस्वीपणे चढाई करून भीमपराक्रम केलाय.

सात्विक चेतन कारेकर असे या बालवीराचे नाव आहे. बा रायगड परिवार आयोजित महाराष्ट्र दिन विशेष लिंगाणा आरोहण मोहिमेत सहा वर्षाच्या सात्विकने सहभाग घेतला होता. बा रायगडच्या सगळ्या मोहिमेत सात्विकचा सक्रिय सहभाग असतो, संवर्धन मोहीम असो, प्रदक्षिणा मोहीम असो वा अभ्यास मोहीम असो, त्यामुळे गडकिल्ल्यांच्या भटकंतीची किल्ली त्याला सापडली आहे. म्हणून बा रायगड परिवारावर विश्वास ठेवून महाराष्ट्र दिनी अवघ्या सहा वर्षाच्या सात्विकने लिंगाणा सर करून महाराष्ट्रचे नाव उंचावले आहे. जिगरबाजी आणि मजबूत पकड आतापासून त्याच्या अंगी दिसून येते. त्यामुळे अगदी हसत खेळत लिंगाणा त्याने सर केला. लहान वयातच लिंगाणावीर म्हणून त्याचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रातुन होत आहे.

लिंगाणाची मोहिम सात्विकचे गिर्यारोहण क्षेत्रातील मार्गदर्शक सागर विजय नलवडे अवघ्या 16 मिनिट 40 सेकदांत हाच लिंगाणा सुळका विनासाहित्य सर केला आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली व बा रायगड परिवाराच्या सर्व टेक्निकल टिम सोबत पार पडली. विशेष म्हणजे सात्विक लहान म्हणून त्याला वर नेण्यासाठी टीमला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. अभिमन्यूला ज्याप्रमाणे आईच्या पोटातच चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान अवगत होते अगदी तसेच काही सात्विकला चढाई करताना पाहून वाटत होते. उत्साह तर होताच पण त्यासोबत त्याची चाल वाखाणण्याजोगी होती. बोरट्याची नाळ उतरत असताना योग्य दगड पाहून ठेवलेली पाऊले, चढाई करताना दगडाला शोधत असलेली ग्रीप/खाच अन ती सापडत नाही हे बघून रोपने क्लाईम्ब करण्याचे प्रसंगावधान, निडर स्वभाव हे त्यात असलेल्या भावी गिर्यारोहकाची छाप सोडतात.

विशेष म्हणजे सात्विक मोहरी – लिंगाणा – मोहरी या दरम्यान दमला असे वाटलं नाही. चढाई करताना त्याच्या दमून भागून बसलेल्या आईला तर मिश्किल पणे चल की पुढे असे म्हणून प्रोत्साहित करत होता. सात्विकची आई चैत्राली कारेकर यांना गडकिल्ले भटकंतीची आवड आहे, सात्विकला त्यानी अगदी 5 वर्षापासून गडकोटांची भटकंती करण्यास शिकवली. आपल्या मुलाने ही सुळके सर करावेत एक उत्तम गिर्यारोहक बनावे अशी सात्विकची आई चैत्राली यांची इच्छा आहे. त्याचे वडील चेतन कारेकर त्याला नेहमी प्रोत्साहन देत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.