Pimpri: कचरा वाहतूक करणाऱ्या एकाच ठेकेदाराला सहाव्यांदा मुदतवाढ!; महापालिकेने राबविली नाही निविदा प्रक्रिया

एमपीसी न्यूज – कचरा वाहतूक करणाऱ्या एका ठेकेदाराला महापालिकेने निविदा प्रक्रिया न राबविता सलग सहा वेळा मुदतवाढ दिली आहे. आता कामाची मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. 

‘ग’ क्षेत्रीय आरोग्य कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 21, 23, 24 आणि 27 मधील दैनंदिन घरोघरचा कचरा, कुंड्यामधील कचरा, सार्वजनिक ठिकाणी साठणारा कचरा, गटारीच्या कडेला असलेले कचऱ्याचे ढीग, मोकळ्या जागेतील कचऱ्याचे ढीग उचलून महापालिकेच्या मोशी कचरा डेपो येथे टाकण्याचे कंत्राट ‘ब’ क्षेत्रीय आरोग्य कार्यालयाकडील ठेकेदार जय गणेश एंटरप्राइजेस, पिंपरी यांना देण्यात आले आहे.

  • प्रति दिन प्रति वाहन दोन खेपांसाठी 5 हजार 130 व भोसरी कचरा केंद्र येथे कचरा खाली करण्यासाठी प्रति दिन प्रति वाहन दोन खेपांसाठी 4 हजार 900 रुपये या दराने 31 डिसेंबर 2016 पासून हे काम देण्यात आले. पहिल्या कंत्राटाची मुदत 31 डिसेंबर 2017 रोजी संपुष्टात आली.

दरम्यान, प्रभाग समित्यांची पुनर्रचना झाली. ‘ब’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभागांचा समावेश ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात झाला. त्यावेळीही जय गणेश एंटरप्रायजेस यांना नवीन क्षेत्रीय प्रभाग कार्यालयामार्फत कचरा वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले. महापालिकेने या ठेकेदाराला कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता 1 जानेवारी 2018 पासून मुदतवाढ देण्याचा सपाटा लावला आहे. आजवर सहावेळा या ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. महापालिकेने गत चौदा महिन्यांच्या कालावधीत सुमारे सव्वाचार कोटी रुपये या ठेकेदाराला मोजले आहेत. 1 मे 2019 ते 30 जून 2019 या कालावधीत प्रशासनाने परस्पर मुदतवाढ दिली.

  • ठेकेदाराला बिल अदा करण्याची वेळ आल्यानंतर प्रशासनाने खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. यामध्ये “ग’ क्षेत्रीय कार्यालयातील कचरा वाहतुकीचा दोन महिन्यांच्या खर्चापोटी 23 लाख तर ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील एक महिन्यांच्या खर्चापोटी 20 लाख रुपये महापालिका या ठेकेदाराला मोजणार आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like