Pimpri: खासगी कंपन्या इंटरनेट सुविधा मोफत देत असताना पालिका पैशांची उधळपट्टी काय करतेय ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत फायबर ऑप्टिकल नेटवर्कीगच्या कामासाठी तब्बल 255 कोटींचा खर्च केला जाणार आहे. तर, दुसरीकडे अनेक खासगी मोबाईल कंपन्या इंटरनेट व इतर आवश्यक सुविधा मोफत व अल्पदरात देत आहेत. असे असताना हा खर्च करून पालिका नागरिकांच्या कररूपी पैश्यांची उधळपट्टी का करीत आहे, असा सवाल स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

पालिकेत झालेल्या समितीच्या बैठकीला महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणार्‍या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. त्यातील फायबर ऑप्टीकल नेटवर्कींगसाठी तब्बल 255 कोटी रूपये खर्च केला जाणार आहे. त्यातील डक्ट निर्मितीसाठी किमान 50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्पात आहे. त्यासंदर्भात खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप व सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केले.

खासगी कंपन्या इंटरनेट व इतर आवश्यक सुविधा मोफत व माफत दरात देत आहेत. त्यामुळे इतकी रक्कम खर्च करून पालिकेने स्वत: फायबर नेटवर्कींगचे काम करण्याची गरज काय आहे ? ही योजना ‘पीपीपी’ तत्वावर का राबविली जात नाही? पाश्‍चात देशांप्रमाणे ‘फाईव्ह-जी’ आणि ‘सिक्स-जी’ इंटरनेट स्पीडने पुरवठा होणार का? यंत्रणा वर्षभरात कालबाह्य झाल्यास काय करणार? भविष्यातील 25 वर्षांतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नियोजन केले आहे का ? या खर्चाचा भार करदात्या नागरिकांवर टाकणार का? काही कंपन्यांनी अनधिकृतपणे रस्ते खोदाई केली आहे. त्यांच्यावर कारवाई करणार का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले गेले.

आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की, इंटरनेट सुविधा देण्यासाठी ही पायाभूत सुविधा आहे. ही निविदा 7 वर्षे कालावधीसाठी असून, इंटरनेट सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचे असणार आहे. तंत्रज्ञान जुने झाल्यास प्रगत तंत्रज्ञानाबाबत बदल करून देण्याची जबाबदारी ठेकेदार कंपनीची आहे. विविध एजन्सींना या माध्यमातून पालिका इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तसेच, चौका-चौकात ‘एलईडी’ जाहिरात फलक तसेच, खांब उभारणार आहे. त्यातून पालिकेस उत्पन्न मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.