Pimpri : स्मार्ट सिटीच्या 847 कोटीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

344 कोटीच्या कामाला स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटीच्या सन 2019-2020 च्या 847 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आज (गुरुवारी)मान्यता देण्यात आली. 34 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. तसेच आज झालेल्या बैठकीत 344 कोटी रुपयांच्या कामाला मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर शहराच्या उर्वरित भागात पुढील आठ दिवसात सायकल शेअरिंग प्रकल्प सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची बैठक झाली. या बैठकीला स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्मार्ट सिटीचे संचालक महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन चिखले, स्मार्ट सिटीचे सहमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील, निळकंठ पोमण, स्मार्ट सिटीचे वित्तीय अधिकारी जितेंद्र कोळंबे उपस्थित होते. तर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व पीसीएससीएलचे अध्यक्ष डॉ. नितीन करिर हे अॅडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते. तर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव आर.एस.सिंग, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे गैरहजर होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.

एरिया बेस अंतर्गत पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव परिसरातील रस्ते, चौकांचे सुशोभीकरण करणे, सार्वजनिक स्वच्छतागृह, दोन उद्याने विकसित करणे या कामाच्या 344 कोटी रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. हे काम बी. जे. शिर्के यांना देण्यात आले. त्याचबरोबर पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव परिसरात प्रायोगिक तत्वार ई-स्कूटर प्रकल्प सुरुवात करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय शहराच्या उर्वरित भागामध्ये सायकल शेअरिंग सुरु करण्यास मान्यता मिळाली. आठ दिवसात सर्व भागात सायकल शेअरिंग सुरु केले जाईल. भविष्यातील आवश्यक स्कील डेव्हलपमेंट आणि नद्यांच्या विकासासाठी कंपनी स्थापन करण्याच्या प्रक्रियेला देखील मंजुरी मिळाल्याचे, हर्डीकर यांनी सांगितले.

त्याचबरोबर पॅनसिटी अंतर्गत सिटी सेर्विलन्स, सोल्यूशन, सीटी नेटवर्क, कंट्रोल अॅन्ड कमांड सेट्रल, स्मार्ट वॉटर, स्मार्ट नेटवर्क, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट मोबाईल अॅप या 458 कोटी रुपयांच्या निविदेबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहेत. त्या दोन दिवसात दूर करुन उपसमितीची मान्यता घेऊन त्याला मंजुरी देण्यात येणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

ई-क्लासरुम आणि स्कूलस लर्निंग व रिसोर्स इम्प्रूव्हमेंटची कामाची निविदा अंतिम टप्यात आहे. पीपीपीच्या माध्यमातून पिंपळेगुरव येथे बहुसुविधा क्रीडा केंद्र, कोकणे चौक येथे फेरीवाल्यांसाठी क्षेत्र, पिंपळेगुरव येथे व्हिलेझ प्लाझा, पिंपळेसौदागर येथे दवाखाना सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.