Pimpri: स्मार्ट सिटीअंतर्गत पालिका ‘इन्क्युबेटर सेंटर’ उभारणार

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट अप’ मोहिमेला पिंपरी-चिंचवड महापालिका पाठबळ देणार आहे. नवउद्योजकांना चालना देण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी महापालिका ‘इन्क्युबेटर सेंटर’ उभारणार आहे. त्याला नुकत्याच झालेल्या पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

बेरोजगारी दूर व्हावी, उद्योजकता वाढीस लागावी, नवीन योजना स्वयंरोजगादाद्वारे आर्थिक विकास व्हावा या हेतूने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत स्टार्ट अप धोरण राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या वतीने ‘इन्क्युबेटर सेंटर’ सुरु करण्यात येणार आहे. त्याद्वारे नव उद्योजकांना प्रोत्साहन देणे, नवीन उद्योजकांसाठी चांगले वातावरण निर्माण करणे, उद्योगासाठी सर्वोतोपरी मदत करणे, त्याच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा प्रमुख उद्देश ठेवण्यात आला आहे.

बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना तंत्रकुशल बनविण्यात येणार आहे. कौशल्य केंद्रही उभारण्यात येणार आहे. उद्योजक, विद्यापीठातील प्राध्यापक, त्या क्षेत्रातील तज्ज्ञ तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. हा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘पॅनसिटी’ प्रकल्पाचाच एक घटक आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘पॅनसिटी’ अंतर्गत ‘इन्क्युबेटर सेंटर’ उभारण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नव उद्योजकांना प्रोत्साहन देणे, उद्योगासाठी चांगले वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. ‘इन्क्युबेटर सेंटर’ उभारण्यास स्मार्ट सिटीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्ष प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा खर्च ‘स्टार्ट अप’ योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाणार आहे’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.