Pimpri: ‘स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणजे ‘मुंगेरी लालके हसीन सपने’ -सचिन साठे

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीच्या नावाखाली डिजिटल सुविधा देण्यासाठी अनेक योजना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये दुरसंचार वाहिन्यांचे नेटवर्क, वायफाय, किऑस्क यंत्र, डिजिटल बोर्ड, फेस्टिवल ऑफ फ्युचर, सिटीझन हॅकेथॉन, स्टार्टअप पिचफेस्ट, स्पीकर सिरीज या योजना म्हणजे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय आहे, असे प्रकल्प म्हणजे नागरिकांना ‘मुंगेरी लालके हसीन सपने’ दाखविण्याचा प्रकार आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. संथगतीने सुरु असलेल्या विकास कामांमुळे मागील तीन चार महिन्यांपासून खोदून ठेवलेले शहरातील बहुतांशी रस्ते वाहतूकीस अडथळा निर्माण करीत आहेत. शहरभर धुळीचे साम्राज्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या मिळकतींना अडीचपट करवाढ आणि प्रतिमाणसी प्रतिदिन चाळीस लिटर पेक्षा जास्त पाणी वापरणा-या नळजोड धारकांना वाढीव पाणीपट्टी आकारण्यास मिळकतधारकांचा तीव्र विरोध आहे. ही करवाढ सर्व साधारण फेटाळावी. अन्यथा, मिळकतधारक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशारा देत साठे म्हणाले, शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक असतानाही आयुक्तांच्या आडमुठेपणामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाणी गळती रोखून बेकायदेशीर नळजोड शोधून त्यावर कारवाई करण्याऐवजी आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागासाठी चारशे कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्याचे प्रस्तावित केले आहे. महापालिकेच्या मुदत ठेवींच्या व्याजापोटी दोनशे कोटींहून जास्त रक्कम मिळत असताना कर्जरोखे काढण्याचा ‘उद्योग’ नेमका कोणाच्या भल्यासाठी करणार आहे, याचे उत्तर करदात्या नागरिकांना मिळाले पाहिजे, असेही साठे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.