Pimpri: स्मार्ट सिटीच्या निविदेस राहुल कलाटे यांचा आक्षेप म्हणजे निव्वळ स्टंटबाजी

शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांचा गटनेत्यावरच हल्लाबोल; कलाटे स्थायी समितीत पक्षाची बाजू मांडत नसल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीने काढलेल्या ‘ई-लर्निंग’च्या निविदेस शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी घेतलेला आक्षेप म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे. कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली नसल्याचा राग मनात ठेवून आकस बुद्धीने कलाटे हे या निविदा प्रक्रियेला विरोध करीत आहेत, अशी टीका थेरगावचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचेच नगरसेवक सचिन भोसले यांनी केली आहे. तसेच कलाटे हे स्थायी समिती सभेत पक्षाची भूमिका परखडपणे मांडत नाहीत, असा घरचा आहेरही त्यांनी दिला आहे. ‘ई-लर्निंग’च्या प्रकल्पास जर विरोध केला. तर, शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणा-या ‘म्युनिसिपल क्लासरूम’ची 44 कोटी रुपयांची निविदा स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने मंजुर केली आहे. तथापि, 44 कोटी पैकी शिक्षण विभागाचे 40 कोटी रुपये वापरले जाणार आहेत. महापालिकेचा 40 कोटी रुपये हिस्सा असताना हा प्रस्ताव शिक्षण समिती, स्थायी समितीला अंधारात ठेवून कसा मंजूर केला? असा सवाल बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत कलाटे यांनी केला होता.

  • त्याला आज शिवसेनेचेच नगरसेवक सचिन भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. ‘ई-लर्निंग’च्या निविदेस कलाटे यांनी घेतलेला आक्षेप हा अर्धवट माहिती व निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेली ‘स्टंटबाजी’ आहे. स्मार्ट सिटी हे एसपीव्ही अंतर्गत स्वतंत्र नोंदणी झालेली कंपनी आहे. स्मार्ट सिटीला निधी खर्च करण्याबाबत व विकास प्रकल्प राबविण्याबाबत स्वतंत्र अधिकार आहेत.

कंपनीच्या संचालक मंडळावर कलाटे यांची नियुक्ती झाली नाही. याचा राग मनात ठेवून आकस बुद्धीने कलाटे हे या निविदा प्रक्रियेला विरोध करीत आहेत. या प्रकल्पास शिवसेनेचा पूर्ण पाठींबा आहे. शिवसेना नेहमी विद्यार्थ्यांचे हित, नागकिरांना आवश्यक असणारे प्रकल्प आणि जनहिताच्या प्रकल्पांचे समर्थन करीत आली आहे.

  • शहरातील सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी केल्या जाणा-या उपक्रमाला आक्षेप घेण्यापेक्षा स्थायी समितीत विकास प्रकल्पाच्या नावाखाली सुरु असलेली लूट थांबवावी. अनावश्यक प्रकल्पांना विरोध करावा. तरच ते शिवसेनेचे गटनेते शोभतील अशी टीका भोसले यांनी केली आहे. ‘ई-लर्निंग’ प्रकल्पास जर विरोध केला. तर शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भोसले यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.