Pimpri: ‘स्मार्ट सिटी’ला आणखी दोन वर्षे भेडसावणार पाणी टंचाई

नियोजन अद्याप कागदावर; अहवालातून प्रशासनाची कबुली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड या स्मार्ट सिटीसाठी भामा – आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहेत. थेट पवना धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणणे, रावेत बंधारा दुरूस्त करणे, नवीन बंधारा बांधणे, आदी मुख्य योजनांचा समावेश आहे. मात्र, या योजना पूर्णत्वास येण्यास किमान दोन वर्षे लागणार असून तोपर्यंत पर्यायी स्त्रोत निर्माण होणे शक्य नाही अशी कबुलीच महापालिकेने दिली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीला आणखी दोन वर्षे पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी शहरातील विविध प्रश्नासंदर्भात पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत महापालिकेच्या अधिका-यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापालिकेने सादर केलेल्या अहवालावरून ही बाब समोर आली आहे. पिंपरी – चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, शहर वाढीचा वेग आणि शहराच्या 20 टक्के भागात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा या कारणांमुळे शहरात सध्या पाणीटंचाई सदृश्य परिस्थती निर्माण झाली आहे.

पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये हिशोबबाह्य पाण्याचे प्रमाणही 35 ते 40 टक्के आहे. या सर्वांचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठयावर होत आहे. धरण भरलेले असताना पाणी टंचाई कशासाठी ? असा प्रश्न नागरिकांबरोबर स्वपक्षीय नगरसेवकही विचारू लागल्याने सत्ताधाऱ्यांची अक्षरशः झोप उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.