शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Pimpri : स्मार्ट सिटीमध्ये धावली स्मार्ट वाहने; स्मार्ट सिटी कार्यालयाचे उदघाटन, लीप कंपनीच्या 45 इलेक्ट्रिक स्कूटरचे शहरात लॉन्चिंग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने विविध उपाय आणि सुविधांची सुरुवात केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीमध्ये पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 45 इलेक्ट्रिक स्कूटर सुरु करण्यात आल्या आहेत. लीप बाईक (leapbike) च्या वतीने ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कार्यालयाचे आज (रविवारी) ऑटो क्लस्टर येथे उदघाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडगिरी, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी इलेक्ट्रिक बाईकची एक राईड देखील केली. पर्यावरणपूरक असणा-या या सेवेचे सर्वांनी कौतुक केले.

लीप बाईक या कंपनीच्या वतीने सुरुवातीला 45 इलेक्ट्रिक स्कूटर शहरवासीयांच्या सेवेत सादर केल्या आहेत. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या भागात या स्कूटर लावल्या जाणार आहेत. दोन्ही भागात एकूण 12 पार्किंग लोकेशन तयार करण्यात आली आहेत. तर दोन चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आले आहेत. पिंपळे सौदागर येथे एक चार्जिंग स्टेशन आहे. तर वाकड बीआरटीएसच्या जागेत दुसरे चार्जिंग स्टेशन आहे. चार्जिंग करण्यासाठी व इतर देखभालीसाठी लीप बाईक या कंपनीची टीम काम करणार आहे.

एकदा चार्जिंग केल्यानंतर ही स्कूटर 60 किलोमीटर धावणार आहे. या स्कूटरचा वेग 25 किलोमीटर प्रति तास आहे. सुमारे 13 रुपये प्रति किलोमीटर एवढा खर्च नागरिकांना यासाठी येणार आहे. लीप बाईकचे एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. प्ले स्टोअरमध्ये leap या नावाने हे अ‍ॅप्लिकेशन आहे.

अ‍ॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यावर रजिस्ट्रेशन करावे लागेल. प्राथमिक माहिती भरल्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यास रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. तसेच आधार कार्डद्वारे देखील रजिस्ट्रेशन करता येईल. मात्र, आधार कार्डद्वारे रजिस्ट्रेशन करणे पर्यायी असणार आहे. स्मार्ट सिटीमधील नागरिक आता पर्यावरणपूरक स्मार्ट वाहनाने प्रवास करणार आहेत.

spot_img
Latest news
Related news