Pimpri: आयुक्तांना स्थायीचा झटका; ‘स्मार्ट वॉच’चा प्रस्ताव फेटाळला 

एमपीसी न्यूज – स्वच्छता कामगारांच्या मनगटावर बांधण्यासाठी नागपूर महापालिकेच्या धर्तीवर चार हजार 544  ‘स्मार्ट वॉच’ थेट पद्धतीने खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर आग्रही होते. परंतु, सत्ताधा-यांनी हा प्रस्वाव फेटाळून लावत आयुक्तांना चांगलाच दणका दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची तहकूब सभा आज (शुक्रवारी)पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. शहर स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने होण्यासाठी सात कोटी खर्चुन सफाई कामगारांच्या मनगटावर बांधण्यात येणारी चार हजार 544 ‘स्मार्ट वॉच’ घेण्याचा घाट प्रशासनाने घातला होता. परंतु, याला विरोधी पक्षांसह सत्ताधा-यांनी देखील विरोध केला. त्यामुळे मागील आठवड्यात स्थायी समितीने हा प्रस्ताव तहकूब केला होता. त्यानंतर आज तो फेटाळण्यात आला आहे.

महापालिकेचे क्षेत्रफळ 181 चौरस किलोमीटरपर्यंत विस्तारलेले आहे. दैनंदिन साफसफाई, रस्ते स्वच्छता, किटकनाशक फवारणी, नाले सफाई, कचरा संकलन आणि वाहतूक, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आदी कामे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केली जातात. आठवड्याच्या सातही दिवस ही कामे अविरतपणे सुरु असतात. शहर स्वच्छतेकामी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयानिहाय कामागर नेमले आहेत. त्यात सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मलेरिया निरीक्षक, वाहन चालक, आरोग्य सहायक, मुकादम, गटरकुली, सफाई कामगार, सफाई सेवक, कचराकुली, मजुर, स्पे्र कुली, कंपोस्टकुली, शिपाई, मेंटेनंस हेल्पर सेवेतील 1800 कामगारांचा समावेश आहे.

काही सफाई कामगारांच्या कामचुकारपणामुळे सर्वच कामगारांवर ताशेरे ओढले जातात. त्यामुळे सर्व स्वच्छता कामगारांवर, आरोग्य निरीक्षकांवर नजर ठेवण्यासाठी ‘स्मार्ट वॉच’ ची मदत घेतली जाणार होती. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 4544 नगांची खरेदी करण्यात येणार होती. परंतु, त्याला विरोधकांसह सत्ताधा-यांनी देखील विरोध दर्शविला होता. त्यानंतर आज झालेल्या स्थायी समितीत हा प्रस्वात फेटाळण्यात आला आहे.

स्थायीचे सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, ‘स्मार्ट वॉच’साठी भाडे जास्त आहे. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. वॉच भाड्याने घेण्याऐवजी खरेदी करणे सोयीचे होईल’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.