Pimpri : कोरोना मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकार; महापालिकेचीही संमती

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये,  अशा मृतदेहांवर रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय व नातेवाईक पुढे येत नसल्याचे समोर आले आहे. तसेच मृताच्या नातेवाईकांनी मृतावरील कायदेशीर हक्क नाकारल्यास  पिंपरी-चिंचवड मुस्लिम सुरक्षा संघटनेने अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर  यांनीही लेखी संमती दिली आहे.  दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाचे दफन करण्याचे निर्देश आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये म्हणून शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी, अखिल मुजावर, अजीज शेख, फरोज शेख, मोहसीन शहा यांचा समावेश आहे. यासाठी  त्यांनी पिंपरी – चिंचवड मुस्लिम सुरक्षा संघटना स्थापन केली आहे.

या संघटनेच्या माध्यमातून कोरोनाच्या मृतदेहांवर विनामूल्य अंत्यसंस्कार ( दफनविधी )  करण्याची  परवानगी महापालिका आयुक्तांकडे मागण्यात आली. त्याला आयुक्तांनी परवानगी दिली आहे.    अंत्यसंस्कार करताना प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन केला जाणार असल्याचे रफिक कुरेशी यांनी सांगितले.

कोरोना मृतदेहांवर निगडी येथील मुस्लिम कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात येणार आहेत. या दफनविधीसाठी पिंपरी – चिंचवड मुस्लिम सुरक्षा संघटना, जन्नतूल बकी वेलफेअर ट्रस्ट, निगडी मुस्लिम कब्रस्तान आणि कुल जमात तंजीम, चिंचवडचे मेहबूब लियाकत यांनी मदतीची तयारी दर्शवली आहे.

या सेवाभावी कार्यकर्ते आणि संस्थांना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लेखी परवानगी दिली आहे. त्याचबरोबर संबंधित रुग्णाचे नातेवाईक, स्थानिक पोलीस, महापालिका,  वैद्यकीय  अधिकारी आणि दफनविधी करणारे कर्मचारी यांनी सामंजस्याने दफनविधी   करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.