Pimpri: महापालिकेत समाजसेवकांची पदे रिक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागात समाजसेवक कार्यरत असलेल्या महिला कर्मचा-याला जातवैधता प्रमाणपत्र सादर करता न आल्याने त्यांना महापालिका सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरवस्ती विकास योजना विभागातील समाज सेवकांची सर्वच पदे आता रिक्‍त झाली असून या विभागाचा कारभार कसा चालणार ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शहराची लोकसंख्या 20 लाखांपेक्षा अधिक आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाकडून महिला बालकल्याण, मागासवर्गीय योजना, अपंग कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सर्वसामान्य जनतेशी संबंधित कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्याने या विभागात लोकप्रतिनिधींचा कायम राबता असतो. या विभागात प्रामुख्याने सामाजिक कार्यातील पदवी (एम.एस. डब्ल्यू) असलेल्या प्रशिक्षित कर्मचा-यांची आवश्‍यक्‍ता भासते. मुख्य समाज विकास अधिकारी, समाज विकास अधिकारी व समाजसेवक ही सर्व पदे एम.एस. डब्ल्यू. शैक्षणिक अर्हता असलेल्या कर्मचा-यांचा यात समावेश आहे.

सध्या या विभागात सुधारित आकृतिबंधानुसार एकूण 51 अधिकारी व कर्मचा-यांची गरज आहे. त्यापैकी 26 पदे मंजूर असून, त्यापैकी सुमारे 25 पदे भरलेली आहे. या विभागाकरिता समाजसेवक संवर्गाची एकूण चार पदे मंजूर आहेत. त्यापैकी तीन पदे भरण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या सेवेत निवड झाल्याने दोन कर्मचा-यांनी समाजसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महापालिका आस्थापनेवर समाजसेवक संवर्गाच्या केवळ एकाच पदावर महिला कर्मचारी कार्यरत होती. मात्र, या महिला कर्मचा-याला मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करता न आल्याने त्यांना महापालिका सेवेतून कमी करण्यात आले आहे. आता महापालिका आस्थापनेवर समाजसेवकाची चार पदे मंजूर असताना देखील एकही कर्मचारी कार्यरत नसल्याने कामाचा ताण वाढत आहे.

समाजसेवक संवर्गाखालोखाल वस्ती पातळीवर अन्य कामे करण्यासाठी आवश्‍यक असलेली समूह संघटक या सहाय्यभूत 16 पदांची आवश्‍यकता असूनही, यापैकी केवळ 10 पदे मानधन तत्त्वावर भरण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील वस्त्यांमधील लाभार्थींपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी चर्चासत्र, मेळावे, पथनाट्य, अर्ज भरून घेणे अशा अनेक कामांना मर्यादा आलेल्या आहेत. येत्या तीन महिन्यांत या विभागाला मिळालेला निधी खर्च करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी त्यामध्ये अडचण येत आहे. याशिवाय समाजसेवक पदाकरिता अर्ज मागवूनदेखील अद्यापही पदे भरण्यात न आल्याने त्यामध्ये भर पडत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.