Pimpri : अल्फा लावलच्या सहकार्याने सायन्स पार्कमध्ये सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित

अल्फा लावलच्या उपक्रमामुळे वर्षाकाठी 51 टन कार्बनडाय ऑक्साईडची निर्मिती कमी होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिकेच्या विज्ञान वाटिकेसाठी (सायन्स पार्क) अल्फा लावलने 40 किलोवॅटसचा सौर वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे. टाटा पॉवरच्या तंत्रज्ञानाने बनविलेल्या या प्रकल्पातून वाटिकेच्या संपूर्ण दुमजली इमारतीला वीजपुरवठा केला जाईल. या वीजनिर्मितीमुळे वर्षाकाठी 51 टन कार्बनडाय ऑक्साईडची निर्मिती कमी होईल. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (मंगळवारी) या प्रकल्पाचे उद््घाटन झाले.

विज्ञान वाटिकेचे संचालक प्रवीण तुपे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, विज्ञान वाटिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावळे, अल्फा लावल इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष कायदा व कंपनी सचिव आणि भारत-पश्चिम आशिया-आफ्रिका विभागातील कायदाप्रमुख निशांत श्रीवास्तव हे यावेळी उपस्थित होते. सौर उर्जेचे रुपांतर वीजेमध्ये कसे केले जाते हे मुलांना समजावे म्हणून त्यासंबंधीची एक छोटी प्रतिकृतीही अल्फा लावलने यावेळी प्रकल्पाला उपलब्ध करून दिली.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, “शाश्वत विकासासाठी पूरक असणाऱ्या सौर उर्जेसंबंधीचा हा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल आम्ही अल्फा लावल कंपनीला धन्यवाद देतो. हा प्रकल्प हाती घेऊन कंपनीने इतर कंपन्या आणि नागरिकांपुढे एक अनुकरणीय उदाहरण ठेवले आहे. या प्रकल्पातून स्वच्छ आणि हरित उर्जानिर्मितीचा एक आदर्श आपण निर्माण करू शकतो. या प्रकल्पामुळे वाटिकेच्या खर्चात बचत तर होईलच शिवाय या वाटिकेला भेट देणाऱ्यांना विशेषतः लहान मुलांना शाश्वत पद्धतीने उर्जानिर्मिती कशी करता येते याचे एक प्रात्यक्षिक पहायला मिळेल याचा आम्हाला आनंद वाटतो”

अशा प्रकारचे प्रकल्प आम्हाला सार्वजनिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, शाळा अशा ठिकाणी हवे आहेत. अल्फा लावलचे आभार मानतानाच मी इतर कंपन्यांनाही अशा प्रकारचे अभिनव व शाश्वत विकासाला पूरक उपक्रम राबविण्याचे आवाहन करते. अशा प्रकल्पांमुळे शहर पर्यावरण पूरक बनण्याला खूप मदत होईल. कंपन्यांनी असे उपक्रम हाती घेतले तर महापालिका त्याचे स्वागत करेल आणि त्यांना सर्व प्रकारची मदत करेल, असेही त्या म्हणाल्या.

अल्फा लावलच्या भारत, पश्चिम आशिया आणि आफ्रिका गटाचे अध्यक्ष व भारतातील कार्यकारी संचालक अनंत पद्मनाभन म्हणाले की, विज्ञान वाटिकेतील सौर वीजनिर्मिती प्रकल्प हा आमचा शाश्वत विकासाप्रती असलेल्या निष्ठेचे एक प्रतीक आहे. कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करणे याला आता काही पर्याय नाही. ते कमी करणे ही आत्ताची एक महत्त्वाची आणि तातडीची गरज आहे. त्यादृष्टिने शक्य तितके योगदान देणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही समजतो आणि त्यादृष्टिने अशा उपक्रमांद्वारे योगदान देऊ शकल्याबद्दल समाधान वाटते.

या विज्ञान वाटिकेत वाहननिर्मिती, उर्जा, हवामान बदल आणि विज्ञानातील गंमत असे वेगवेगळे विभाग आहेत. वाटिकेतील विभागांमध्ये विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील नवनव्या शोधांची माहिती मिळते. उर्जा आणि हवामान बदल विभागांमध्ये विज्ञान आणि पर्यावरणातील गुंतागुंतीचे संबंध सुलभ पद्धतीने मांडण्यात आले आहेत. या वाटिकेतील विज्ञानासंबंधी त्रिमिती कार्यक्रम, आकाश निरीक्षण आणि तारामंडल कार्यक्रम लोकप्रिय आहेत. सुट्ट्यांच्या काळात या वाटिकेला दररोज सुमारे आठशे लोक भेट देतात आणि येथील सुमारे 280 विज्ञान प्रतिकृतींचा अनुभव घेतात, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.