Pimpri: कचरा संकलनाचा उडाला बोजवारा; गृहनिर्माण सोसाट्यांमधील उचलला जात नाही कचरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने 1 जुलैपासून मोठा गाजावाजा करत नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन सुरु केले. नगरसेवकांनी कचरा गाड्यांचे पूजन करत ‘फोटोसेशन’ केले. प्रत्यक्षात मात्र कचरा संकलनाचा बोजवारा उडाला आहे. शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचले आहेत. गृहनिर्माण सोसाट्यांमधील कचरा कुड्यांतील कचरा कर्मचा-यांकडून उचलून टाकला जात नाही. त्यामुळे चिंचवड परिसरातील अनेक सोसाट्यांमध्ये कचरा पडून असल्याचे वास्तव आहे. यमुनानगर येथील कचरा उचलला जात नसल्याची तक्रार आहे.

महापालिकेने शहराची दोन भागांत विभागणी केली आहे. शहरातील उत्तर भागाचे कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना दिले आहे. तर, दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना देण्यात आले आहे. दोन्ही कंत्राटदारांना आठ वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे. वाहने उपलब्ध नसल्याने कचरा उचलण्याचे काम दोन महिने उशिराने सुरु झाले.

1 जुलैपासून सुरु झालेल्या या कामाचा बोजवारा उडाला. प्रत्येक वाहनावर असलेल्या तीन कर्मचा-यांच्या संख्येत एकने कपात केल्याने, कचरा उचलण्याचे काम अपेक्षित वेगाने होत नाही. शहरातील अनेक भागात कच-याचे ढीग साचले आहेत. गृहनिर्माण सोसाट्यांमधील कचरा उचला जात नाही. कामाची घडी बिघडली आहे. कचरा गोळा करणा-या गाड्यांची वेळ बदलली आहे. शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. पावसाळा सुरु झाल्याने, संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्‍यता आहे. चिंचवड, शाहूनगर परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांमधील कचरा उचला जात नाही. सोसाट्यांमधील नागरिकांनी ओला आणि सुका कचरा स्वतंत्र केला जातो. परंतु, महापालिकेच्या कचरा गाडीतील कर्मचा-यांकडून कचरा उचलला जात नाही.

चिंचवड थॅरमॅक्स चौक येथील शांतीनिकेतन सोसायटीतील श्रीधर चलका म्हणाले, ”सहा दिवसांपासून कचरागाडी आली नव्हती. बुधवारी (दि. 4) कचरा गाडी आली. पण कचरा उचलला गेला नाही. कचरा उचलणारे कर्मचारी आम्ही कचरा उचलणार नाही असे सांगतात. त्यामुळे ओला आणि सुका वेगळा केलेला कचरा पडून आहे. यापूर्वी कचरागाडीतील कर्मचारी कचराकुंडी उचलून घेऊन कचरा गाडीत टाकत होते. आत्ता काही ठिकाणी अडचण आहे. चिंचवड, शाहुनगर परिसरातील अनेक अनेक गृहनिर्माण सोसाट्यांमध्ये हीच परिस्थिती आहे”.

प्रदीप पाटील म्हणाले, ”निगडी, यमुनानगर परिसरात दोन दिवसांपासून कचरा गाडी आली नाही. गाडी येण्याची वेळ निश्चित नाही. कर्मचा-यांकडून कचरा उचलला जात नाही. यापूर्वी कचरा उचलून गाडीत टाकत होते. मग आत्ताच काही अडचन आहे. कचरा गाडी वेळेवर आली. तर, आम्ही कचरा गाडीत टाकू पण गाडी देखील वेळेत येत नाही. गाड्यांची उंची जास्त आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांना कचरा गाडीत टाकताना अडचण येत आहे. यावर महापालिकेने मार्ग काढला पाहिजे”

महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”कचरा गाडीवरील कर्मचारी गृहनिर्माण सोसाट्यांमधील देखील कचरा उचलत आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आजच बैठक घेऊन कचरा उचलण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. काही भागात कचरा साचला असून तो उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. 100 किलोहून अधिक कचरा निर्माण होणा-या गृहनिर्माण सोसाट्यांनी कच-याची विल्हेवाट लावायची आहे. कंपोस्टखत प्रकल्प बनवायचा आहे. सध्या सोसाट्यांमधील कचरा घेतला जात आहे. परंतु, त्यांना कंपोस्टखत प्रकल्प करणे बंधनकारक आहे”.

”कचरा गाडीवर एकच कर्मचारी आहे. त्यामुळे मोठ्या गृहनिर्माण सोसायटीतील एक माणूस कचरा कुंडी उचलताना मदतीला लागणार आहे. एकटा माणूस कचराकुंडी उचलू शकत नाही. त्यामुळे सोसायटीतील एका नागरिकाने मदत करणे अपेक्षित आहे. निगडीतील छोट्या घरांमधील कचरा कर्मचा-यांनी उचलला पाहिजे. याबाबत कंत्राटगारामार्फत कर्मचा-यांना सूचना दिल्या जातील”, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.