Pimpri: ‘एचए’चे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावा ; खासदार बारणे यांची रसायनमंत्र्यांकडे मागणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील भारत सरकारची हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स (एचए) ही कंपनी अनेक समस्यांनी ग्रासली आहे. कंपनीच्या कामगारांचा  19 महिन्याचा पगार प्रलंबित असून कंपनीकडे पुरेसे पैसे नसल्याने कंपनी चालू ठेवणे व्यवस्थापनाला कठीण जात आहे. कंपनीच्या जमीन विक्रीची परवानगी मिळूनही जमिनीची विक्री होऊ शकली नाही. यासाठी दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध करूनही कोणी खरेदीदार पुढे आला नाही. यामुळे  कंपनी चालू ठेवणे अधिकच कठीण झाले आहे. एच.ए. कंपनीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

याबाबत केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेत खासदार बारणे यांनी हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीच्या प्रलंबित प्रश्ना बाबत सविस्तर चर्चा केली. तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.खासदार  बारणे  यांच्या पाठ्पुराव्याने कंपनीला  केंद्र सरकारकडून 100 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाले होते. त्यात  कंपनीच्या   कामगारांचा थकीत पगार देऊन कंपनीचे उत्पादन चालू करण्यात आले आहे. कंपनी सुस्थित चालू ठेवण्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे.

कंपनी पूर्वस्थितीत आणण्यासाठी तसेच सेवा निवृतीची रक्कम व कामगारांचे थकीत पगार देण्यासाठी केंद्रीय केमिकल फार्टिलायझर मंत्रालयाने केंद्रीय आर्थिक संबधित कॅबिनेट कमिटीपुढे 450 करोड रुपये कंपनीस देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यास आजपर्यंत मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे एच.ए. कंपनीच्या अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत, असे खासदार  श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे.

सरकार या प्रश्नाबाबत सकारात्मक आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी संबधित विभागाच्या आधिका-यां समवेत बैठक बोलावली आहे. एच.ए कंपनीला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन मंत्री गौडा यांनी दिल्याचे  बारणे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.