Pimpri : विशेष मुलाने केले कळसूबाई शिखर सर

गिर्यारोहक कणादच्या 12 व्या वाढदिवसानिमित्तचा उपक्रम

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कणाद प्रशांत पिंपळनेरकर या किशोरवयीन विशेष मुलाने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’वर यशस्वी गिर्यारोहण करुन आपला १२ वा वाढदिवस साजरा केला. कणाद लहानपणापासून ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे विशेष मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी हे यश उत्साहवर्धक व प्रेरणादायक ठरणार आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांनी कणाद कधीही चालू शकणार नाही, असे सांगितले होते. त्याउलट कणादने आय्यप्पाच्या छोट्या टेकडीपासून पावलं मांडत, प्रयत्नांची पराकाष्ठा करत, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाईवर यशस्वी गिर्यारोहण करुन सतत प्रयत्नशील राहण्याचा चांगला संदेश दिला आहे. कणाद पुणे येथील बालकल्याण संस्थेत वेगवेगळ्या गोष्टी शिकत आहे.

गेल्या वर्षी 7 दिवसात 11 किल्ले सर केल्याचा विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकोर्ड’ने नोंद घेतली आहे. या वर्षी नारायणगड, हडसर, चावंड हे तीन किल्ले आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ ही सलग चढाईची मोहिम दिनांक 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत आपल्या आई-वडिलांसोबत कणादने फत्ते केली. दिनांक 23 डिसेंबर रोजी नारायणगड तीन तासात आणि चार तासात हडसर या गिरिदुर्गांवर यशस्वी आरोहण केले.

दिनांक 24 डिसेंबर रोजी किल्ले चावंड या गिरिदुर्गाची चढाई चार तासात पूर्ण केली. दिनांक 25 डिसेंबर रोजी वाढदिवसी सकाळी 9 वाजता कळसूबाई शिखराची चढाई सुरु केली. शिखरावर जाणार्‍या वाटेतल्या चार लोखंडी शिड्या हे कणादसाठी एक मोठेच आव्हान होते. मात्र न डगमगता, भीतीवर मात करत, दुपारी 2 वाजता कळसूबाई शिखरमाथा गाठला. वर पोचताच कणादने भगवा झेंडा आणि राष्ट्रध्वज फडकवून आपला आनंद व्यक्त केला.

कळसूबाईचे दर्शन व आशीर्वाद घेऊन पायथ्याला संध्याकाळी 7 वाजता सुखरुप पोचून कणादने मोहीम पूर्ण केली. या मोहिमेतील नारायणगड, हडसर आणि चावंड हे तिन्ही किल्ले गिर्यारोहणाच्या वाटांसाठी वैविध्यपूर्ण आहेत. त्यामुळे या तिन्ही किल्ले चढाईचा एकत्रित अनुभव लगेचच कळसूबाई शिखर चढण्यास कामी आला. विशेष मुलाद्वारे कळसूबाई शिखर सर केल्याची ही पहिलीच वेळ असल्याची भावना शिखर पायथ्याच्या बारी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

आई दर्शना आणि वडील प्रशांत पिंपळनेरकर म्हणाले, ‘निसर्गरम्य ठिकाणी, डोंगरी भागात वेगवेगळ्या वाटांवर भटकंती करताना कणादच्या नैसर्गिक क्षमताही वाढू लागल्या आहेत. यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने दिलेल्या सहकार्य आणि प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले आहे’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.