Pimpri: महापालिका अर्थसंकल्प मंजुरीसाठी उद्या विशेष महासभा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2019-20 या आर्थिक वर्षांचा 6,183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी उद्या (शनिवारी) दुपारी दोन वाजता विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आचारसंहिता असल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत:च्या अधिकारात अर्थसंकल्पाच्या अंमलबाजवणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या मंजुरीची केवळ औपचारिकता आहे.

महापालिकेचा सन 2018-19 चे सुधारित आणि 2019-20 या आर्थिक वर्षांचा मूळ 4, 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6, 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी स्थायी समिती समोर सादर केला होता.

  • स्थायी समितीने आयुक्तांच्या अर्थसंकल्पात सुधारणा करत 267 कोटी रुपयांच्या उपसूचनांचा समावेश केला. अर्थसंकल्पाची अंतिम मान्यतेसाठी 28 फेब्रुवारी रोजी महासभेकडे शिफारस केली.

तथापि, 10 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे अर्थसंकल्पाला महासभेची मान्यता मिळाली नाही. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत:च्या अधिकारात अर्थसंकल्पाच्या अंमलबाजवणीला सुरुवात केली. त्यात कोणताही फेरफार अथवा बदल न करण्याचा धोरणात्मक निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

  • स्थायी समिती सदस्यांनी मांडलेल्या 267 कोटी रुपयांच्या उपसूचना रद्द करत आयुक्तांचा मूळ अर्थसंकल्प जशाच तसे अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठविला आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरु असल्याने त्यावर चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मंजुरीची केवळ औपचारिकता राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.