Pimpri : पिंपरी-चिंचवडला बनवणार ‘पर्यावरण संतुलित’ स्मार्ट शहर – श्रावण हर्डीकर

(मुलाखत / गणेश यादव)

पिंपरी-चिंचवड शहराची वाढ वेगात सुरु आहे. शहर विकास, भविष्याचे नियोजन, पाण्याचे नियोजन याबाबत आगामी दहा वर्षांच्या काय योजना आहेत. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी साधलेला संवाद…

प्रश्न: आपण आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर दोन वर्षात शहरासाठी काय केले ?

उत्तर – पिंपरी-चिंचवड शहर हे एक वेगाने वाढणारे शहर आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला भविष्यकाळात दिशाहीन आणि नियोजनशून्य शहरात रहावे लागू नये याकरिता अनेक उपाययोजना मी राबवल्या. पाण्याच्या शाश्वततेसाठी अमृत योजनेतून उर्वरित 60 टक्के भागासाठी पाणीपुरवठा योजना, जुन्या गावांमध्ये अनेक वर्षांपूर्वी टाकलेल्या मलनिस्सारण नलिकांचे पुनरुज्जीवन आणि चिखली, पिंपळेनिलख आणि बोपखेल भागात नवीन मलनिस्सारण प्रकल्प अमृत योजनेमधून प्रस्तावित केले. घनकचरा व्यवस्थापनासाठी पंचवीस वर्ष योग्य पद्धतीने ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पाचे नियोजन केले. शहरात निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर प्रक्रिया करणे. त्याचे वहन करणे याकरिता प्रकल्प नियोजित केला. जुने अनेक वर्षापासून रेंगाळलेले बीआरटी मार्गाच्या कामाला गती दिली.

नवीन समाविष्ट झालेल्या गावात विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. त्यात महत्त्वाचे म्हणजे रस्ते, आरक्षणे यांचा विकास सुरू केला. घराघरातून कचरा उचलणे त्याचे वहन करणे कचऱ्याचे विलगीकरण करणे यासाठी प्रयत्न केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरिबांसाठी किफायतशीर घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकाद्वारे राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांचे नियोजन करून बांधकामास सुरुवात केली. त्यासोबतच खासगी विकासकांमार्फत देखील प्रस्ताव मंजूर करून घेतले. प्रा. रामकृष्ण मोरे, आचार्य अत्रे इत्यादी रंग मंदिरांचे सुशोभीकरण पूर्ण केले.

शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यासाठी प्रकल्प सुरु केले. शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी प्रयत्न केला. दिव्यांगांसाठी व्यक्तिगत सहाय्याची योजना आणून त्यांच्या विकासासाठी दिव्यांग कल्याणकारी केंद्राची स्थापना करण्यास सुरुवात केली. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर व इतर स्मार्ट प्रकल्पांचे नियोजन केले. स्मार्ट क्लास रूम प्रकल्पाचे नियोजन केले. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पदपथांची व्यवस्था करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प तयार करून त्यांची अंमलबजावणी सुरू केली. उद्यान विकासावर भर देऊन शिवसृष्टी, लिनियर गार्डन इत्यादी नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले. यासोबतच अनेक छोटे-मोठे प्रकल्प महापालिका शहरवासीयांसाठी निरंतर राबवत आहे.

प्रश्न: भविष्यात या शहराकडे तुम्ही कसे पाहता ?

उत्तर – पिंपरी-चिंचवड शहर हे पुढील दहा वर्षात देशातील सर्वात जगण्यायोग्य, आर्थिकदृष्ट्या संपन्न, पर्यावरण संतुलित, स्मार्ट शहर असेल याची मला खात्री आहे.

प्रश्न: भविष्याचा वेध घेणारे काय नियोजन केले आहे ?

उत्तर – भविष्यात शहराला आर्थिक सुबत्ता देणारे आणि पर्यटनाला चालना देणारे काही प्रकल्प नियोजित करण्यात येत आहेत. सोबतच शहरातील दोन्ही महत्त्वाच्या नद्या पवना आणि इंद्रायणी यांच्या प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी दूर करून नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येणार आहे. शहरांमध्ये नागरिकांना मेट्रो आणि मेट्रोला जोडण्यासाठी एचसीएमटीआर माध्यमातून किफायतशीर पण जलद आणि आरामदायी अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.

प्रश्न: शहराची हद्द वाढत आहे, 11 गावे समाविष्ट होणार आहेत. ही आव्हाने कशा प्रकारे पेलली जाणार आहेत ?

उत्तर – ज्या वेगाने शहर वाढत आहे. त्या वेगानं शहराचा विकास करणे, वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यकतेनुसार सेवा आणि रस्ते यांची उपलब्धता करणे आणि भविष्यातील लोकसंख्या वाढ विचारात घेऊन पर्यावरण संतुलित जगण्यायोग्य शहर बनवण्यासाठी योग्य नियोजन करणे हेच एक महत्त्वाचे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी वित्तीय स्थिती भक्कम ठेवून काम करण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

प्रश्न: स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून कोणकोणते नवे प्रकल्प आणणार आहात ?

उत्तर – स्मार्ट पार्किंग, स्मार्ट पाणीपुरवठा, स्मार्ट मलनिस्सारण व्यवस्था, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट वाहतूक नियंत्रण यासोबतच नागरिकांसाठी सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करणे, स्मार्ट वाहतूक व्यवस्था निर्माण करणे, नागरिकांना घरबसल्या शासनाच्या आणि महापालिकेच्या सेवा मिळण्यासाठी ‘स्मार्ट सारथी अॅप तयार करणे. संपूर्ण शहरात सुरक्षित चालण्यायोग्य, सायकल चालवणे योग्य रस्ते निर्माण करणे आणि नागरिकांसाठी सुंदर निर्मळ सार्वजनिक स्थळांचा विकास करणे. कोकणे चौक आणि पिंपळेगुरव येथील उद्यान येथे नाविन्यपूर्ण प्रकल्प करणे.

प्रश्न: वाढत्या लोकसंख्येमुळे शहरावर येणार ताण कसा कमी करता येऊ शकतो ?

उत्तर – पिंपरी-चिंचवड शहर वेगाने वाढत आहे. दररोज वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा मलनिस्सारण घनकचरा व्यवस्थापन या सर्वच बाबींवर ताण येत असतो. पण, त्यावर मात करण्यासाठी भावी गरजांचे नियोजन करणे हेच महापालिकेचे काम आहे. काम निरंतर सुरु असते.

प्रश्न: शहरातील वाढती अनधिकृत बांधकामे नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या?

उत्तर – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनधिकृत बांधकामे वाढू नयेत याकरिता पोलिसांच्या मदतीने बांधकामे निष्कासित करण्यासाठी पथके वाढविण्यात येत आहेत. बांधकामे सुरू असतानाच ती निष्कासित करण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना इमारत बांधण्यापूर्वी बांधकाम परवानगी घेण्यासाठी सुलभ प्रक्रिया राबवता यावी याकरिता प्रणाली सुधारण्यात येत आहे.

प्रश्न: पवना बंद पाईपलाईन, आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत ?

उत्तर – आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पातील पाणी आरक्षण पुनरुज्जीवित करण्यात आले आहे. आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलून शहरात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सोबतच पवना बंद पाईपलाईन योजना सुरू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे.

प्रश्न: मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी महापालिकेचा पाठपुरावा कसा आहे?

उत्तर – मेट्रो प्रकल्प निगडीपर्यंत नेण्यासाठी प्रस्ताव करून त्यास राज्य शासनाची मंजुरी घेऊन केंद्र शासनाकडे सादर केला आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल असा विश्वास आहे.

प्रश्न: सत्ताधारी आणि नोकरशहा यात समतोल कसा साधता ?

उत्तर – सत्ताधारी आणि नोकरशहा ही एकाच गाडीची दोन चाके आहेत. ती दोन्ही एकत्र चालली तरच गाडी योग्य दिशेने वेगात पळू शकते आणि ती बाब घडवून आणण्यासाठी मी प्रयत्नशील असतो.

प्रश्न: पिंपरी-चिंचवड मधील कारकिर्दीला तुम्ही दहापैकी किती मार्क द्याल?

उत्तर – मार्क देण्याचे काम तुमचे आहे. मी केवळ काम करण्यावर लक्ष देतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like