Pimpri: संवेदनशील मतदान केंद्रावर राहणार सूक्ष्म निरीक्षकांची करडी नजर

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरातील 37 मतदान केंद्र संवेदनशील ठरविली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वतंत्र सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांची नजर राहणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (सोमवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ व शहरालगतच्या मावळ मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले जावे यासाठी निवडणूक आयोग तसेच पोलीस, महसूल प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

एखाद्या मतदान केंद्रांवर प्रमाणापेक्षा कमी मतदान होणे. एकाच उमदेवाराला 70 टक्क्‌यांपेक्षा अधिक मतदान मिळणे. सिंगल वोटर्सची संख्या अधिक असणे किंवा मतदान केंद्राला असलेला हिंसाचाराचा इतिहास, अशी मतदान केंद्रे संवेदनशील ठरवण्यात येतात.

पिपंरी-चिंचवड शहराचा विचार केला असता पिंपरी-चिंचवड शहरातील 3 विधानसभा मतदारसंघामध्ये 37 मतदारसंघ संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पिंपरीत सर्वाधिक 19, चिंचवडमध्ये 12 आणि भोसरीत सर्वात कमी 6 केंद्र संवेदनशील आहेत. या केंद्रांवर पोलिसांचा, केंद्रीय सुरक्षा दलाचा अतिरिक्त फौजफाटा तैनात राहणार आहे. या शिवाय प्रत्येक संवेदनशील मतदान केंद्रावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात येणार आहे. या निरीक्षकाच्या माध्यमातून या मतदान केंद्रांचा संपूर्ण अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे.

सूक्ष्म निरीक्षकांचा अहवाल थेट निवडणूक आयोगाकडे

संवेदनशील आणि असुरक्षित मतदान केंद्रावर सर्व ठिकाणी सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सूक्ष्म निरीक्षकांना मतदान केंद्रावर इव्हीएम मशीन घेऊन जाण्यापासून ते मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तेथील अहवाल थेट निवडणूक आयोगाकडे पाठवावा लागणार आहे. तसेच मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इव्हीएम मशीन मतमोजणीच्या ठिकाणी स्ट्रॉंग रुममध्ये सील होईपर्यत या सूक्ष्म निरीक्षकांची नजर असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.