Pimpri: थुंकीबहाद्दर, मास्क न घालणाऱ्यांकडून दोन महिन्यात साडेसात लाखाचा दंड वसूल

Spit person, a fine of Rs 7.5 lakh was collected from those who did not wear masks in two months

दिवसभरात एक लाख 12 हजार रुपये वसूल

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न घालणा-यांविरोधात पिंपरी पालिका आरोग्य विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यात 1682 थुंकीबहाद्दरांकडून दोन लाख 52 हजार 300 रुपये आणि मास्क न घालणा-या 720 जणांकडून 3 लाख 69 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.  तर, आज बुधवारी दिवसभरात 166 थुंकीबहाद्दरांकडून 24 हजार 900 तर मास्क घालणा-या 176 जणांकडून 88 हजार रुपये दंड वसूल केला आहे. असे एकूण आजपर्यंत 2744 जणांकडून 7 लाख 34 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय यांनी दिली.

शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. थुंकीमधून या विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होतो. थुंकी सुकली नाही तर, पुढील काही तास या थुंकीतले विषाणू जिवंत राहतात आणि आजार बळावण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर थुंकू नये असे आवाहन महापालिकेकडून केले जाते.

परंतु, नागरिकांकडून त्याचे उल्लंघन केले जात आहे. तसेच मास्क घालणे देखील बंधनकारक केले आहे. त्याचे देखील नागरिकांकडून पालन केले जात नाही. त्यामुळे पालिका आरोग्य विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांकडून 150 रुपये तर मास्क न घालणा-यांकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे.

23 एप्रिल ते 23 जून 2020 दरम्यान पालिकेने 1682 थुंकीबहाद्दरांवर कारवाई करत त्यांच्याकडून दोन लाख 52 हजार 300 रुपये दंड वसूल केला.

‘अ’ प्रभागातील 275, ‘ब’ 141, ‘क’ 158, ‘ड’ 270, ‘इ’ 117, ‘फ’ 165, ‘ग’ 309 आणि ‘ह’ 247 जणांवर कारवाई केली. त्यात ‘ग’ प्रभागातील सर्वाधिक 309 आणि ‘इ’ प्रभागातील सर्वात कमी 117  जणांवर कारवाई केली.

तर, मास्क न घालणा-या 720 जणांकडून तीन लाख 69 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे. त्यामध्ये ‘अ’ प्रभागातील 50, ‘ब’ 58, ‘क’ 94, ‘ड’ 69, ‘इ’ 19, ‘फ’ 16, ‘ग’ 347 आणि ‘ह’ 86 जणांवर कारवाई केली आहे. त्यात ‘ग’ प्रभागातील सर्वाधिक 347 आणि ‘फ’ प्रभागातील सर्वात कमी 16  जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

दिवसभरात एक लाख 12 हजार रुपये वसूल

महापालिकेने आज धडक कारवाई केली. दिवसभरात 166 थुंकीबहाद्दरांकडून 24 हजार 900 तर मास्क घालणा-या 176 जणांकडून 88 हजार रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या ‘ह’ प्रभागातील सर्वाधिक 97 आणि सर्वांत कमी म्हणजेच ‘ब’ प्रभागातील 0 जणांवर कारवाई केली. तर मास्क न घालणा-या ह’ प्रभागातील सर्वाधिक 56 आणि सर्वांत कमी ‘अ’ प्रभागातील  तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.