Pimpri Sport News : रोलबॉल खेळाचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यात तयार झालेल्या रोलबॉल या खेळाचा स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय) आणि भारतीय विद्यापीठ संघ (एआययु) यामध्ये समावेश करावा. याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. राज्य शासनाने रोलबॉल या खेळाचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश केला असल्याचे पत्र पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठवले आहे.

रोलबॉल या खेळाचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. हा खेळ भारतातील 28 राज्यांमध्ये तसेच जगभरातील 50 पेक्षा अधिक देशांमध्ये खेळला जातो. भारतातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांनी या खेळाला अधिकृत मान्यता दिली आहे. महाराष्ट्रात तयार झालेल्या खेळाला महाराष्ट्रात अधिकृत मान्यता मिळावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य शासनाकडे केली होती.

रोलबॉल या खेळाचा स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय) आणि भारतीय विद्यापीठ संघ (एआययु) यामध्ये समावेश करण्यात यावा, असेही आमदार जगताप यांनी म्हटले होते.

राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर त्या खेळात विशेष प्राविण्य मिळवणा-या खेळाडूंना राज्य सरकारचे क्रीडा पुरस्कार, रोख पारितोषिक तसेच नोकरीमध्ये आरक्षण मिळेल. मात्र महाराष्ट्र राज्यातील रोलबॉल हा खेळ खेळणारे खेळाडू या लाभापासून वंचित आहेत.

राज्य शासनाकडून दिल्या जाणा-या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या यादीत रोलबॉल या खेळाचा समावेश करावा, अशी मागणी देखील आमदार जगताप यांनी केली होती. यावर शासनाने तातडीची उपाययोजना करत रोलबॉल या खेळाला मान्यता देत खेळाचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश केला आहे.

मंत्री सुनील केदार यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, रोलबॉल या खेळाचा समावेश ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धेमध्ये नसल्यामुळे या खेळाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी समावेश करता येणार नाही. रोलबॉल या खेळाचा समावेश शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये करण्यात आला आहे.

दरवर्षी जिल्हा, विभाग, राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित करून राष्ट्रीय स्पर्धेत या खेळाचा संघ सहभागी होत असल्याचेही मंत्री केदार यांच्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.