Pimpri : शहरातील चौक व गर्दीच्या ठिकाणी दर दोन तासांनी जंतुनाशक फवारणी करावी – नाना काटे

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अजूनही प्रभावी उपाय योजना राबविण्याची गरज असून पिंपरी-चिंचवडमधील चौक व गर्दीच्या ठिकाणी दर दोन तासांनी जंतुनाशक फवारणी करण्यात यावी तसेच महापालिकेच्या मुख्यालयासह सर्व क्षेत्रीय कार्यालय, विभागीय कार्यालयांमध्ये दर दोन तासांनी जिने, पोर्च आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

शहरातील नागरिकांमध्ये कोरोना विषाणूविषयी भीती निर्माण झाल्यामुळे सर्वजण मास्क, सॅनिटायझर विकत घेत आहेत. त्यामुळे विक्रेते बनावट मास्क व सॅनिटायझर ची विक्री करु लागले आहेत यामुळे नागरीकांची फसवणूक होत आहे. यांच्यावर प्रशासनाकडून आवश्यक ती कडक कारवाई करावी. शहरातील मॉल बंद करण्याचे निर्देश दिलेले असतानाही शनिवार, रविवार शहरतील सर्वच मॉल बिनधास्तपणे चालू होते. मॉलचालकांना सक्त ताकीद देऊन 31 मार्चपर्यत मॉल बंद ठेवण्याबाबत सूचना देण्यात याव्यात व कोरोना विषाणूबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशी मागणी काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.

 

सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळणे गरजेचे आहे कोरोनाची लक्षणे दिसून यायला उशीर लागत असल्याने परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांचे विलगीकरण कक्षामध्ये स्थंलातर करावे. त्यादृष्टीकोनातून विलगीकरण कक्ष वाढण्यात यावेत, तसेच शहरातील मेळावे, परिषदा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना साथरोग प्रतिबंध कायदा 1897 लागू असल्यामुळे कुठल्याही प्रकारची परवानगी देऊ नये. त्याचप्रमाणे मनपा मुख्यालयामध्ये दोन-तीन हजार कर्मचारी तसेच नागरिकांचा कायम राबता असतो, त्यामुळे मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर शरीराचे तापमान मोजण्यासाठी स्क्रिनिंग गन कर्मचा-यांसह उपलब्ध करुन प्रत्येक कर्मचारी व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, असे काटे यांनी म्हटले आहे.

 

शहरात कोरोना विषाणू संसर्ग ओटक्यात आणण्यासाठी  ज्या ठिकाणी गर्दी जास्त होते अश्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यासंबधी पोलिस प्रशासनाशी चर्चा करण्यात यावी. आवश्यकता पडल्यास शहरात गर्दीच्या ठिकाणी जमावबंदी करण्यात यावी, तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वेक्षण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.