Pimpri: भाजी मंडई, किराणा मालाची दुकाने, चौकात दर चार तासाने जंतूनाशक फवारणी करा – नाना काटे 

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन योग्य उपाययोजना करत आहे. परंतु, शहरातील रस्ते, चौक, भाजी मंडई, किराणा मालांची दुकाने, शहरातील मुख्य चौक, गृहनिर्माण सोसायट्या या ठिकाणी दिवसांतून चार तासांनी अग्निशामक दलाच्या टँकरमधून जंतूनाशक फवारणी करावी. झोपडपट्टी, गल्ल्यांमध्ये देखील वारंवार जंतूनाशक फवारणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज अखेरपर्यंत 12 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. मागील सहा दिवसांपासून एकही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे महापालिका, पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे, परंतु कोरोना विषाणूचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी अजून काही उपाययोजना करण्याची गरज आहे.

प्रामुख्याने  शहरातील रस्ते, चौक व गर्दीच्या ठिकाणांची विशेषत:  भाजी मंडई, किराणा मालांची दुकाने, शहरातील मुख्य चौक, गृह निर्माण मोठ्या सोसायट्या या ठिकाणी दिवसातून चार तासांनी अग्निशामक दलाच्या टँकरमधून जंतूनाशक फवारणी करावी. तसेच झोपडपट्टी भागांमध्ये, छोट्या गल्ली बोळातून छोट्या तीनचाकी मालवाहू टेम्पोमधून जंतूनाशक फवारणी करण्यात यावी. जेणेकरुन या विषाणूचा प्रसार होणार नाही. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.