Pimpri: रॅम्पच्या स्पर्धा न झालेल्या 15 कोटींच्या निविदेला स्थायीची बिनभोबाट मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एम्पायर इस्टेट उड्डाणपुलास चिंचवडमधील लिंक रस्त्यावर उतरणे व चढण्यासाठी रॅम्प उभारण्यात येणार आहे. या रॅम्पच्या तब्बल 15 कोटींच्या कामात स्पर्धाच झाली नाही. निकोप स्पर्धेसाठी फेरनिविदा न केलेल्या एकाच ठेकेदाराच्या निविदेला स्थायी समितीने बिनभोबाट मंजुरी दिली. भाजपच्या भ्रष्टाचाराला विरोध न करता समितीतील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी ‘मूक संमती’  दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर, शिवसेनेचे राहुल कलाटे गैरहजर होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवड येथील एम्पायर इस्टेटलगत उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाला चिंचवडच्या बाजूने चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या. महापालिकेतर्फे या कामासाठी 13 कोटी 99 लाख 57 हजार 668 रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निविदा सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत केवळ मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्‍चर यांचीच निविदा सादर झाली होती. त्यांनी या कामासाठी 15 कोटी 80 लाख 55 हजार 546 रुपयांची निविदा सादर केली होती.

त्यांच्या व्यतिरिक्त कुणाचीही निविदा प्राप्त झाली नाही. निविदेत निकोप स्पर्धा होण्यासाठी महापालिकेने फेरनिविदा प्रसिद्ध करणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता दर कमी करण्याबाबत मातेरे यांच्याशीच 15 मे, 21 जून आणि 28 जून रोजी पत्रव्यवहार केला. त्यानुसार त्यांनी 15 कोटी 48 लाख 50  हजार रुपये इतका सुधारीत दर सादर केला. महाराष्ट्र शासनाच्या सन 2018-19 च्या दरसूचीनुसार टेस्टींग चार्जेस, आरसीसी डिझाईन चार्जेस, सिमेंट व स्टिल फरक आणि रॉयल्टी चार्जेससह या कामाची किंमत 16 कोटी 20 लाख 47 हजार 722  रुपये 25  पैसे इतकी येते.

यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. या दरांची तुलना करता ती एकूण खर्चाच्या 2.52 टक्क्यांनी कमी आहे. एम्पायर इस्टेटसमोरील उड्डाणपुलाला चिंचवडच्या बाजूने चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचे काम मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्‍चर यांच्याकडून करून घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. एकाच ठेकेदाराची निविदा सादर झाल्याने फेरनिविदा करणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासनाने फेरनिविदा केली नाही. त्यामुळे 15 कोटींच्या निविदेत निकोप स्पर्धा झाली नसताना स्थायी समितीने निविदेला बिनभोबाट मान्यता दिली. विरोधकांनी देखील कोणताच आक्षेप घेतला नाही. त्यामुळे भाजपच्या भ्रष्टाचाराला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मूकसंमती दिल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महापालिकेतील चुकीच्या कामांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या सूचना नगरसेवकांना दिल्या होत्या. परंतु, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मात्र अशी कोणतीही भूमिका घेतलेली दिसली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या या मौनाची चांगलीच चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like