Pimpri: स्थायीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास उरला दीड तास; धाकधूक वाढली

शीतल शिंदे, आरती चोंधे, संतोष लोंढे, झामाबाई बारणे यांच्यात चुरस

एमपीसी न्यूज – श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती असणार आहेत, हे स्पष्ट होण्यास अवघे दोन तास उरले आहेत. सत्ताधारी भाजपकडून कोण उमेदवारी अर्ज भरणार याची उत्सुकता लागली असून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. शीतल शिंदे, आरती चोंधे, संतोष लोंढे, झामाबाई बारणे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. निष्ठावान पदाधिका-याला संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपचे पक्षनिरीक्षक व विधानपरिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर शहरात तळ टोकून असल्याची माहिती असून बंडखोरी होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज भरताना ते महापालिकेत येण्याची दाट शक्यता आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे आहेत. प्रत्यक्ष निवडणूक सात मार्च रोजी होणार आहे. परंतु, स्थायीत भाजपचे बहुमत असल्याने अर्ज भरल्यानंतर अध्यक्ष कोण होणार हे लगेच स्पष्ट होणार आहे. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांमध्ये अध्यक्षपदासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. नेत्यांचे आपल्या समर्थकांसाठी ‘लॉबिंग’ सुरु आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शुक्रवारी मुंबईत एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला राज्यातील महिला मंत्री, पुण्यातील एक मुंडे समर्थक महिला आमदार, शहर भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत गतवर्षी स्थायी समितीचा त्याग केलेल्या निष्ठावान पदाधिका-याच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती अतिशय विश्वसनीय सूत्रांनी दिली.

परंतु, शहराचे कारभारी देखील आपल्या समर्थकांसाठी आग्रही आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी होऊ नये, याची पक्षाने दक्षता घेतली आहे. दोन उमेदवारी अर्ज येऊ नयेत. यासाठी भाजपचे पक्षनिरीक्षक व विधानपरिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर शहरात तळ टोकून असल्याची माहिती आहे. बंडखोरी होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज भरताना ठाकूर महापालिकेत येण्याची दाट शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.