Pimpri: ‘स्थायी’च्या बैठकीला दांडी मारणा-या प्रशासन अधिका-यांना आयुक्तांची समज 

एमपीसी न्यूज – वरिष्ठ अधिका-यांच्या गैरहजेरीत जबाबदार अधिकारी म्हणून स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असताना दांडी मारणा-या भुमी, जिंदगी विभाग आणि क्रीडा विभागाच्या प्रशासन अधिका-यांना समज देण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली. 
राजीव किसन जाधवर आणि राजेश भागुजी जगताप अशी समज दिलेल्या भुमी, जिंदगी विभाग आणि क्रीडा विभागाच्या प्रशासन अधिका-यांची नावे आहेत.

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा मंगळवारी (दि.18)आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या दिवशी भुमी आणि जिंदगी विभाग, क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यालयीन कामकाजास्तव मुंबईतील उच्च न्यायालयात गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत विभागाचे कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी जाधवर आणि जगताप यांच्यावर होती. त्यांच्यावर महापालिकेच्या आयोजित, पुर्वनियोजित सभा, बैठकाला विभागाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणे त्यांचे कर्तव्य होते. मात्र मंगळवारी झालेल्या स्थायीच्या सभेला जाधवर आणि जगताप हे दोघेही प्रशासन अधिकारी उपस्थित राहिले नाहीत.
त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. त्यांनी सादर केलेला खुलासा संयुक्तिक नाही. त्यांचे गैरवर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक)नियम 1979 मधील तीनचा भंग करित आहे. त्यामुळे प्रशासन अधिकारी राजीव जाधवर आणि राजेश जगताप यांनी सादर केलेला खुलासा विचारत घेत त्यांना सक्त समज देण्यात आली आहे. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्यात येणार आहे.  यापुढे कामात कुचराई केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.