Pimpri: कोरोना महामारीच्या काळात शहरात दररोज पाणीपुरवठा सुरू करा- मानव कांबळे

Pimpri: Start daily water supply in the city during the Corona epidemic- manav kamble झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून या परिसरात दररोज रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमित हात धुणे तसेच इतर गोष्टींची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध असणे तितकेच महत्वाचे असून महानगरपालिकेने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा न करता तो दररोज करावा अशी, मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी केली आहे.

मानव कांबळे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. कांबळे यांनी या निवेदनात असे म्हटले आहे की, महानगरपालिका कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काम करत असली तरी संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून ही बाब चिंताजनक आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. घर व परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, वारंवार हात धुतले पाहिजे तसेच स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवली पाहिजेत. यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. सध्या केला जाणारा एक दिवसाआड पाणी पुरवठा याकामासाठी अपुरा पडत आहे.

कांबळे पुढे म्हणाले, झोपडपट्टी परिसरात सर्वजणिक स्वछतागृहात पाणी जास्त वापरावे लागते तसेच या नागरिकांकडे पाणी साठवण्यासाठी पुरेशी साधन नसल्यामुळे पाण्याचा तुडवडा भासत आहे.

झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून या परिसरात दररोज रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वछतेचा विचार करून कोरोना महामारीच्या काळात एक दिवसाआड पाणी पुरवठा न करता तो दररोज करावा जेणेकरून नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतेसाठी पाणी कमी पडणार नाही.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हा मुद्दा प्रतिष्ठेचा न करता सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देत शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने निर्णय घ्यावा अशी विनंती मानव कांबळे यांनी आयुक्तांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.