Pimpri: ‘वायसीएम’चे विशेष कार्य अधिकारी डॉ.पंडीत यांना मुदवाढ देण्यास राज्य सरकारचा नकार

महापालिकेने सेवेतून केले कार्यमुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच) रुग्णालयात विशेष कार्य अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीवर असलेले डॉ. पद्माकर पंडीत यांना राज्य सरकारने मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे आज (मंगळवार) पासून त्यांना महापालिका सेवेतून कार्यमुक्त केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्था सुरु केली जाणार आहे. या संस्थेच्या कामासाठी राज्य सरकारने वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रा. डॉ. पद्माकर पंडित यांना प्रतिनियुक्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमच रुग्णालयात विशेष कार्य अधिकारी या पदावर 18 नोव्हेंबर 2016 रोजी नियुक्ती केले होते. मुदत संपल्यानंतर त्यांना 17 नोव्हेंबर 2018 ते 17 फेब्रुवारी 2019 अशी तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती.

  • ही मुदत संपल्यानंतर पुन्हा डॉ. पंडित यांना विशेष कार्य अधिकारी या पदावर 18 फेब्रुवारी 2019 पासून पुढे तीन महिने कालावधीसाठी राज्य सरकारकडे मुदतवाढ मागितली होती. याबाबतचा प्रस्ताव 6 मार्च 2019 रोजी महापालिकेने राज्य सरकारच्या नगर विकास विभागाला पाठविला होता. तथापि, राज्य सरकारने हा प्रस्ताव फेटाळला. मुदतवाढ दिली नाही. त्यानंतर डॉ. पंडित यांनी आपण 31 ऑगस्ट 2019 रोजी सेवानिवृत्त होत आहोत. त्यामुळे प्रतिनियुक्तीवरील सेवा संपुष्टात आणून कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. पंडित यांना वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात मूळ पदावर रुजू होण्यासाठी महापालिका सेवेतून आजपासून कार्यमुक्त केले आहे.

दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. पंडित यांच्याकडे वायसीएमएच रुग्णालयाचा देखील पदभार दिला होता. डॉ. पंडित वादग्रस्त ठरले आहेत. फोन घेत (उचलत) अर्थात संपर्क साधत नसल्याने नगरसेवकांनी त्यांना महासभेत धारेवर धरले होते. प्रतिनियुक्तीची मुदत संपल्यानंतर देखील ते महासभा आणि स्थायी समितीच्या बैठकांना बसले होते. त्यावरुन देखील नगरसेवकांनी त्यांना कोंडीत पकडले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.