Pimpri: राज्य सरकार आपोआप पडणार; शरद पवार जातीवाद निर्माण करतात -चंद्रकांत पाटील

....तरच मनसेसोबत युती

एमपीसी न्यूज – भाजपला दूर ठेवण्याचा एकमेव अजेंडा महाविकास आघाडीचा होता. भाजपची एवढी भीती त्यांना वाटते. आम्ही एवढे वाईट नाहीत. हे सरकार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही. ते आपोआप पडणार असल्याचे भाकीत वर्तवत राज्यात ताकद मिळाली की शरद पवार जातीवाद निर्माण करतात, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच मनसेने मराठीची भूमिका बदलली तरच त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय आमचे नेतृत्व घेईल असेही ते म्हणाले.

आकुर्डीत चंद्रकांत पाटील आज (गुरुवारी) पत्रकारांशी बोलत होते. सरकारमधील दररोज कोण तरी काहीही बोलत आहे. काँग्रेसवाले प्रचंड चिडले आहेत. त्यामुळे सरकार आपोआप पडणार आहे.विधानसभा निवडणुकीत 105 आमदार निवडून येऊनही भाजपची सत्ता नसल्याने लोक आम्हाला विचारत आहेत असे सांगत पाटील म्हणाले,

छत्रपतींच्या गादीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपमान केला आहे. उदयनराजे भोसले यांना ते छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागताहेत. त्याचा आम्ही निषेध करतो. भाजप गावोगावी जाऊन त्याचा निषेध करणार आहे. उदयनराजे यांना पुरावे मागून इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवप्रेमी, उदयनराजे यांचे कार्यकर्ते आता शांत बसणार नाहीत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीम लाला या गुंडाला भेटायला येत होत्या, असे संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. त्याची आम्ही निंदा करतो. परंतु राऊत यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. त्याचा काँग्रेसने देखील विचार केला पाहिजे. काँग्रेसला मान्य असेल तर आम्हाला त्याचे काही घेणे देणे नाही.

राज्यात ताकद मिळाल्यास शरद पवार यांच्याकडून जातिवाद निर्माण केला जातो. संभाजीराजे यांना भाजपने राज्यसभेवर खासदार केले. राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. त्यावेळी देखील पेशवे आता राजे ठरवितात असे विधान पवार यांनी केले होते. तुम्ही राज्यांसाठी काही करीत नाहीत. आम्ही केले तर बोलता. परंतु, लोकशाहीत कोणीही काहीही बोलू शकते असेही ते म्हणाले. आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक मागे घेतले आहे. पुस्तक भाजपने लिहिलेले नव्हते. त्याचा भाजपशी संबंध नाही. त्या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल हे अगोदर शिवसेनेत होते.

आम्ही कोणाची वाट बघत नाही. आमचे काम सुरू आहे. मनसेचा भाजप सोबत येण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही. तसे करायचे असेल तर मनसेला मराठी ही भूमिका बदलावी लागेल. तरच भाजपचे नेतृत्व मनसेला सोबत घेण्याबाबत बसून निर्णय घेईल, असेही पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.