Pimpri: सर्वच नागरिकांना विनाअट तीन महिन्यांचे मोफत धान्य द्या – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे देशभरातील नागरिकांना तीन महिन्याचे धान्य एकाचवेळी मोफत देण्याच्या योजनेसाठी केंद्र सरकारने कोणत्याही अटी किंवा शर्थी घातलेल्या नाहीत. त्याप्रमाणे राज्य शासनाने देखील सर्व नागरिकांना विनाअट तीन महिन्यांचे मोफत धान्य द्यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल केला आहे.

लॉकडाऊनमुळे देशभरातील नागरिकांना तीन महिन्याचे धान्य एकाचवेळी मोफत देण्याच्या योजनेसाठी केंद्र सरकारने कोणत्याही अटी किंवा शर्थी घातलेल्या नाहीत. परंतु, राज्य सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी विकत मिळणारे धान्य खरेदी केले असेल, तरच तीन महिन्यांच्या मोफत धान्य योजनेचा लाभ मिळेल आणि नियमित धान्य घेणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल, अशा अटी घातलेल्या आहेत. तसेच तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मोफत मिळणे अपेक्षित असताना फक्त एक महिन्याचे धान्य दिले जात आहे, याबद्दल जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहेे..

कोरोना विषाणूला हरविण्यासाठी नागरिकांना घरी बसा म्हणून वारंवार आवाहन करायचे आणि त्यांचे पोट भरण्यासाठी योजना असूनही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणायची हे योग्य नाही. राज्य सरकारच्या या दुजाभावामुळे येत्या काळात वेगळ्याच सामाजिक समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी राज्य सरकारने आपली चूक सुधारावी. सर्व नागरिकांना कोणत्याही अटी व शर्थीविना तीन महिन्यांचे मोफत धान्य चालू महिन्यातच देण्यात यावेत, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

या लॉकडाऊनच्या काळात देशातील सामान्यांचे हाल होऊ नयेत. त्यांना दोनवेळचे जेवण सहज मिळावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाला तीन महिन्याचे धान्य एकाचवेळी आणि मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्याही अटी किंवा शर्थी केंद्राने घातलेल्या नाहीत. केंद्र सरकारने नागरिकांना मोफत वाटपासाठी अन्नधान्याचा ९० टक्के कोटा दिला आहे. राज्य सरकारने १ एप्रिलपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवातही केली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने काही जाचक अटी व शर्थी घातल्या आहेत. हे अत्यंत चुकीचे आणि नागरिकांसोबत दुजाभाव करणारे आहे. केंद्र सरकारने धान्य उपलब्ध करून दिलेले असताना आणि राज्य सरकारवर कोणताही बोजा पडणार नसताना ते नागरिकांना देण्यासाठी अटी व शर्थी लावून सरकारला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला आहे.

खरे पाहता राज्य सरकारने अशा संकट काळात प्रत्येकाचे पोट भरावे यासाठी रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही मोफत धान्य देण्याची गरज आहे. आज हातावर पोट असणाऱ्यांना अक्षरशः दिवसात फक्त एकवेळचे जेवण करून दिवस काढावे लागत आहेत. तेही विविध संस्था, संघटना आणि समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदत मिळाली तरच या नागरिकांच्या पोटात एकवेळचे जात आहे. पंरतु, या नागरिकांना मिळणाऱ्या मदतीला मर्यादा आहेत, याची सरकारने जाणीव ठेवावी, अशी अपेक्षा सरकार जगताप यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.