Pimpri: राज्य मानवी हक्क आयोगाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना समन्स; मारुती भापकर यांनी मागितली होती दाद

एमपीसी न्यूज – मुलभूत अधिकारांची पायमल्ली केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना येत्या सोमवारी (दि.16) सुनावणीसाठी आयोगापुढे हजर राहण्याचे समन्स राज्य मानवी हक्क आयोगाने बजावले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयोगाकडे दाद मागितली होती. त्यानुसार समन्स बजाविण्यात आले आहे.

भाजपच्या राज्य कार्यकारणीची बैठक 26 आणि 27 एप्रिल 2017 रोजी चिंचवडमध्ये आयोजित केली होती. तसेच 3 नोव्हेंबर 2018 रोजी निगडीत भाजपचे अटल संकल्प महासंमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. विविध प्रलंबित प्रश्नांकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी मारुती भापकर आंदोलन करणार होते.

मुख्यमंत्री फडणवीस शहरात येण्यापूर्वीच पोलिसांनी भापकर यांना घरीच स्थानद्ध केले. पोलिसांनी स्थानबद्ध करुन मुलभूत अधिकारांवार गदा आणल्याचा आरोप करत भापकर यांनी पोलिसांविरोधात राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली होती. त्याची दखल घेत आयोगाने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना येत्या सोमवारी (दि.16) सुनावणीसाठी आयोगापुढे हजर राहण्याचे समन्स बजाविले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता यावर सुनावणी होणार आहे.

तक्रारीत तत्कालीन अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पिंपरी ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, निगडी ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.