Pimpri: सुकाणू समितीचे सदस्य जाणार गुजरात, तेलंगणा दौ-यावर, सात लाखांचा खर्च; स्थायी समितीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दिव्यांग कल्याणकारी योजनेच्या सुकाणू समितीचे सदस्य आदर्शवत काम केलेल्या संस्था, स्थळांना भेटी देण्यासाठी गुजरात, तेलंगनाच्या अभ्यास दौ-यावर जाणार आहेत. तसेच मुंबई, चंद्रपूर येथे देखील जाणार आहेत. तीन टप्प्यात हा दौरा होणार आहे. या दौ-यासाठी सहा लाख 75 हजार 239 रुपये खर्च येणार असून याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज (बुधवारी) आयत्यावेळी मान्यता दिली.

पिंपरी महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. नागरवस्ती विकास योजना विभागाकडील दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचे प्रमुख व संबंधित अधिका-यांची पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांग कल्याण सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या सुकाणू समितीच्या सदस्यांच्या दौ-याबाबत सामाजिक समावेशन सल्लागार समीर घोष यांनी 31 ऑक्टोबर 2019 रोजी महापालिकेला ई-मेलद्वारे कळविले आहे. त्यानुसार समितीचे काही सदस्य, सल्लागार घोष यांच्या शोभना संस्थेकडील चार सदस्य आदर्शवत काम केलेल्या संस्था, स्थळांना भेट देऊन माहिती घेण्यासाठी अभ्यास दौ-यावर जाणार आहेत.

गुजरात, अहमदाबादमधील सेन्स इंटरनॅशनल आणि अंध असोसिएशनला 13 अधिकारी 23 नोव्हेंबर रोजी भेट देणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनला 30 नोव्हेंबर रोजी 21 अधिकारी भेट देणार आहेत. तेलंगणातील सोसायटी फॉर इलिमीशन ऑफ रुरल पॉवर्टी, एनआयएमएच, युथ 4 जॉब, डॉयलॉग इन डार्कला 13 अधिकारी 5 ते 7 डिसेंबर रोजी 13 अधिकारी तीन दिवसीय दौरा करणार आहेत.

मुंबईतील टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स, नवी मुंबईतील ईटीसी, एच.के.आय.डी.बीचा 15 ते 17 असा तीन दिवसीय दौरा 13 अधिकारी करणार आहेत. दौ-यातील अधिका-यांचा विमान प्रवास, स्थानिक प्रवास, भोजन, निवास व्यवस्थेसाठी येणा-या सात लाख 75 हजार 239 रुपयाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.