Pimpri: ‘क्लस्टर व रेड झोन परिसर सील करणे त्वरीत बंद करा’

Pimpri: stop sealing cluster and red zone premises परिसरातील बॅंक व्यवहार बंद ठेवले जातात व नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रतिबंध केला जातो. यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते असे या निवेदनात म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना प्रसार रोखण्यासाठी कोरोना बाधित रुग्ण सापडलेला परिसर अथवा इमारत पत्रे लावून सील केली जात आहेत. मात्र, असे केल्याने त्या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे असा परिसर अथवा इमारत पत्रे लावून सील करणे त्वरीत बंद करावे.

अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक, प्रतिसाद फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष संतोष दाभाडे व सामाजिक कार्यकर्ते राहुल धामणकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, देशात व राज्यात गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी ज्या परिसरात बाधित रुग्ण सापडतो तो परिसर अथवा इमारत पत्रे लावून सील केली जात आहेत.

तसेच, या परिसरातील बॅंक व्यवहार बंद ठेवले जातात व नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रतिबंध केला जातो. यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते असे या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिबंधित क्षेत्र पत्रे व बांबू लावून सील केल्यामुळे अशा परिसरातील एखाद्या कुटुंबात हदयविकार, बाळंतपण, वैद्यकीय सेवा किंवा अति तातडीची सेवा लागणार असेल तर त्यांनी बाहेर कसे जायचे असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे संबंध परिसर सील करण्याऐवजी रुग्ण सापडलेलं संबंधित घरच सील करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

1) कोरोना रुग्ण सापडलेल्या इमारतीला पत्रे लावण्याची पध्दत बंद करावी.

2) संपूर्ण परिसर अथवा इमारत सील न करता रुग्ण सापडलेलं घरच फक्त सील करावे

3) कोणत्याही परिस्थितीत कोणताही परिसर क्लस्टर व बफर झोन घोषित करुण बंद करण्यात येऊ नये

4) रुग्ण सापडलेल्या परिसरात जास्तीत जास्त रोगप्रतिबंधक गोळया वाटण्यात याव्यात तसेच सॅनिटायझर फवारणी केली जावी

5) या परिसरातील नागरिकांची जनजागृती करण्यासाठी व कोरोना विषयक माहिती देण्यासाठी डॉक्टरांना पाठवण्यात यावे

या मागण्यांचा विचार करून 10 दिवसांत त्वरित निर्णय घेण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा प्रदीप नाईक, संतोष दाभाडे, राहुल धामणकर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.