Pimpri: व्यवसाय सुरु करण्यास परवानगीसाठी करवसुलीची अट नको – आमदार अण्णा बनसोडे

Pimpri: There should not be tax collection condition for permission to start a business again - MLA Anna Bansode

एमपीसी न्यूज – गेली 45 दिवसांपासून टाळेबंदीमुळे शहरातील अनेक व्यावसाय बंद आहेत. व्यावसायिक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. पिंपरी महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील व्यावसायिकांना परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, ही परवानगी मिळण्यासाठी मालमत्ता कर भरणा केल्याची पावती जोडणे अनिवार्य केले आहे.

हा प्रकार म्हणजे, व्यावसाय सुरु करण्याचा नावाखालील महापालिकेने टाळेबंदीतही करवसुली सुरु केली आहे. करवसूली तत्काळ थांबवावी आणि व्यवसाय सुरु करण्याबाबत धोरण तातडीने निश्चित करावे, अशी सूचना राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे की, सध्या ‘कोविड–19’ या महामारीच्या कठीण परिस्थितीत परवानगीच्या नावाखाली कर वसुली करणे अन्यायकारक आहे. अनेक दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने शहरातील लहान-लहान दुकानदारांची आर्थिकदृष्ट्या मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या धोरणाप्रमाणे, विविध प्रकारच्या दुकानदारांची सूची तयार करावी.

आठवड्यातील वारानुसार शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्याबाबत धोरण जाहीर करावे. असे धोरण निश्चित झाल्यास कोणत्याही व्यावसायिकास महापालिकेकडे अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. महापालिका प्रशासनावरील अतिरिक्त कामाचा ताण पुर्णतः कमी होईल. परिणामी, प्रशासनास शहरातील कोरोना नियंत्रित करण्याच्यादृष्टीने योग्य त्या खबरदारीचे उपाय योजण्यावर लक्ष केंद्रित ठेवणे सोयीचे ठरणार आहे.

महापालिकेने कोरोना सारख्या माहामारीच्या संकट समयी स्थानिक करदात्यांकडे थकबाकीदार म्हणून न पाहता पालकाच्या भूमिकेतून त्यांना संपूर्ण सहकार्य करणे अपेक्षित आहे. शहरातील जो दुकानदार/व्यावसायिक कर भरणा मागील अनेक वर्षानुवर्षे करीत आहे. तो घटक आज संकटात आहे. या महामारीच्या काळात अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय भांडवला अभावी बंद पडणार आहेत. त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून महापालिकेने उत्पनाकडे लक्ष केंद्रित न करता व्यावसायिकांना आधार द्यावा. त्यासाठी सर्व समावेशक धोरण तातडीने निश्चित करावे, अशा सूचना आमदार बनसोडे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.