Pimpri : शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांची मनमानी त्वरित थांबवावी

एमपीसी न्यूज – निगडी येथील अ व ज शिधावाटप परिमंडळ कार्यालयातील अधिकारी निवडणूक कामकाजाच्या नावाखाली मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय निरिक्षक रामराव नवघन यांनी केला आहे. कामकाज बंद करुन शिधापत्रिकाधारकांची पिळवणूक करीत असून त्यांची ही मनमानी त्वरीत थांबविण्यात यावी अशी मागणी नवघन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनामध्ये केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, निगडी येथील परिमंडळ अधिकारी इलेक्शन ड्युटीच्या व ऑनलाईनच्या नावाखाली नवीन दुबार नूतनीकरण व विभक्त शिधापत्रिकेचे कामकाज बंद ठेवून मनमानी कारभार करीत आहेत. शिधापत्रिकाधारकांना दोन ते तीन महिने अर्ज देऊन सुध्दा शिधापत्रिका मिळत नाहीत. कोणत्या दिवशी कार्यालय उघडायचे व कोणत्या दिवशी बंद ठेवायचे हे सुध्दा परिमंडळ अधिकारी ठरवतात. मंगळवारी (दि.26) आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन निगडी येथील परिमंडळ कार्यालयात एकही कर्मचारी न ठेवता कार्यालय कुलुप लावून बंद ठेवण्यात आले होते.

  • शासनाकडून शिधापत्रिकाधारकाला आलेल्या वस्तू कुठे जातात याची त्वरित वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी. शिधापत्रिकाधारकांची लुबाडणुक करणा-या स्वस्त धान्य दुकानदारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. निगडी येथील अ व ज परिमंडळ अधिकारी मनमानी करुन शिधापत्रिकेचे कामकाज बंद करतात. त्यांची ही मनमानी त्वरीत थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, पुणे जिल्हयाचे अध्यक्ष सुभाष कोठारी, पुणे जिल्हा निरिक्षक दिलीप टेकाळे, जिल्हा संघटक मुनीर शेख, पुणे कार्याध्यक्ष विकास कांबळे, पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष अविनाश रानवडे, पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष ओमकार शेरे, पिंपरी-चिंचवड शहराचे सचिव लक्ष्मण दवणे, सचिव पिंपरी-चिंचवड डॉ.सतीश नगरकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.