Pimpri: नियमबाह्यपणे बिले अदा करणा-या अभियंत्याच्या दोन वेतनवाढ स्थगित

एमपीसी न्यूज – निविदा नस्ती हेतुपुरस्सर गहाळ केल्याने आणि नियमबाह्यपणे बिले अदा केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विद्युत विभागातील कनिष्ठ अभियत्याच्या दोन वेतनवाढ स्थगित करण्यात आल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली.

गणेश धोंडिबा राऊत असे वेतनवाढ स्थगित केलेल्या विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. कामकाजाची मुळ निविदा नस्ती चार्ज हस्तांतरणावेळी गहाळ झाल्याने आणि वरिष्ठांशी उद्धट वर्तन केल्याप्रकरणी राऊत यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये नस्ती गहाळ झाल्याचे आणि करारनाम्यानुसार निर्धारीत केलेल्या चौकात हायमास्क दिवे बसविल्याची खात्री केली नाही. निविदा नस्ती उपलब्ध नसताना, प्रत्यक्ष कामकाज मुदतीत झाले नसताना संगनमताने रनिंग बिलाद्वारे रक्कम अदा केली. तसेच संचिका जाणुन-बुजून गहाळ हेतुपुरस्सर गहाळ केल्याचे चौकशीत शाबीत झाले.

  • त्याचबरोबर सायन्स पार्क येथे रोहित्र संच बसविण्याच्या कामाचा आदेश न देता रोहित्र संच बसविले. खोटे रेकॉर्ड तयार करत बिल अदा केल्याने महापालिकेची फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी राऊत यांनी केलेला खुलासा आयुक्तांना संयुक्तित वाटला नाही. निविदा नस्ती हेतुपुरस्सर गहाळ केल्याने आणि नियमबाह्यपणे बिले अदा केल्याने कनिष्ठ अभियंता गणेश राऊत यांच्या दोन वेतनवाढी स्थगित करण्यात आल्या आहेत.

या आदेशाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात केली जाणार आहे. तसेच यापुढे कार्यालयीन कामकाजामध्ये गैरवर्तन केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.