Pimpri: जलतरण तलाव, बांधकाम, वॉशिंग सेंटरचा पाणीपुरवठा बंद करा

नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांची मागणी

एमपीसी न्यूज – पवना धरणातील पाणीसाठा उन्हामुळे झपाट्याने घटत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे शहरातील जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, बांधकामांसाठी पुरविण्यात येणारा पाणीपुरवठा त्वरित बंद करावा, अशी मागणी नगरसेविका, स्थायी समिती सदस्या प्रज्ञा खानोलकर यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. पवना धरणातील पाणीसाठा उन्हामुळे झपाट्याने घटत आहे. त्यामुळे प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. पाणी गळती न रोखणे, अनधिकृत नळकनेक्शनवर कारवाई केली असती तर पाणी कपात करण्याची गरज भासली नसती.

  • मिळणा-या पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणीपुरवठा केला असता तर, शहरातील नागरीकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागले नसते. परंतु, प्रशासनाने या बाबींकडे दुर्लक्ष केल्यामुळे एक दिवसाआड पाणी कपातीचे संकट कोसळले आहे.

शहरवासियांनी एकदिवसाआड पाणीपुरवठा होत असताना जलतरण तलाव, वॉशिंग सेंटरला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होत नाही. तोपर्यंत शहरातील जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर तसेच बांधकामासाठी पुरविण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करावा.

  • तसेच पवना बंद जलवाहिनीचे काम आणि भामा आसखेड जलवाहिनीव्दारे पाणी आणण्याचा प्रकल्प त्वरीत मार्गी लावण्याची मागणी नगरसेविका खानोलकर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.