Pimpri: जगताप डेअरी येथील स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या कामाचा मार्ग मोकळा

लष्कराला महापालिका देणार पावणे तीन कोटी; स्थायीची मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी चौक ते पिंपळे सौदागार येथील शिवार चौक या रस्त्याच्या 45 मीटर जागेच्या मोबदल्यात संरक्षण विभागाने मागणी केलेला 2 कोटी 65 लाख 48 हजार 351 रूपयांचा निधी देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या (पर्जन्यमान जलवाहिनीच्या) कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेच्या बीआरटीएस स्थापत्य विभागाच्या वतीने शहरातील काही मार्गावर रूंदीकरणाची कामे सुरू आहेत. त्यापैकी पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी चौक येथे काम सुरू आहे. त्या अंतर्गत जगताप डेअरी चौक ते शिवार चौक या दरम्यानच्या 45 मीटर रस्त्याच्या दक्षिणेकडील संरक्षण विभागाची सीमाभिंत आहे. त्याला लागून स्ट्रॉम वॉटर वाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र, हे काम संरक्षण विभागामार्फत थांबविण्यात आले होते.

त्याबाबत पालिकेच्या अधिकार्‍यांनी औंधच्या 330 इन्फ्रन्टी बिग्रेडचे कॅप्टन दिलीप शेखर यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यांनी आर-9 रस्त्यासंदर्भात उर्वरित 2 कोटी 65 लाख 48 हजार 351 रूपये संरक्षण विभागास अदा करण्याचा सूचना केल्या. पैसे अदा केल्यानंतरच या जागी काम करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. या जागेसाठी 4 कोटी 40 लाख 62 हजार 351 रूपयांची मागणी संरक्षण विभागाने केली होती.

पालिकेने आतापर्यंत 1 कोटी 75 लाख 14 रूपयांची रक्कम संरक्षण विभागास अदा केली आहे. थांबलेले काम सुरू करण्यासाठी उर्वरित 2 कोटी 65 लाख 48 हजार 351 रूपये संरक्षण विभागास देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.