Pimpri: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात आठ दिवसांकरिता कडक लॉकडाऊन करा-गजानन चिंचवडे

Strict lockdown for eight days in the city to break the corona chain; Shiv Sena's demand : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात आठ दिवसांकरिता कडक लॉकडाऊन करा; Gajanan Chinchwade

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसाला दोनशे , तीनशेहून अधिक रुग्ण पॉझिटीव्ह येत आहेत. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी महापालिकेला केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात चिंचवडे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढीचा वेग दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. ही चिंताजनक बाब आहे.

शहरातील कोरोना बाधितांचा आकडा चार हजारांच्या उंबरठ्यावर आहे. मागील काही दिवसांपासून एका दिवसाला दीडशे ते दोनशे, तिनशेहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत.

महापालिका व खासगी रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर देखील उपचाराबाबत रुग्णांना,नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शहरामध्ये रुग्णालयात बेडची संख्या अपुरी पडत आहे. शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. आता ख-या अर्थाने कोरोनाची साखळी तोडण्याची आवश्यकता आहे.

वाढती रुग्णसंख्या पाहता नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल महापालिकांनी लॉकडाऊन केला आहे. आपल्या शहरातही रुग्णसंख्या वाढीचा वेग मोठ्या प्रमाणावर आहे.यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही कठोर पाऊले उचलणे अत्यंत आवश्यक आहे.

या साठी सर्व पक्षीय नेते, खासदार, आमदार, नगरसेवक, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या समवेत चर्चा विनिमय करुन किमान 7 ते 15 दिवसांचा कठोर लॉकडाऊन करावा, अशी मागणी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केली आहे.

लॉकडाउन केला तरच किमान परिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.