Pimpri: बाहेरुन शहरात येणाऱ्या नागरिकांबाबत नियमावली तयार करून कडक अंमलबजावणी करा -अश्विनी चिंचवडे

Pimpri : Strictly enforce guidelines for citizens coming to the city from outside - Ashwini Chinchwade

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चौथा लॉकडाउन सुरु झाल्यापासून मूळगावी गेलेले अनेक नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात परतत आहेत. शहरात येणा-या अनेक जणांची तपासणी केली जात नाही. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही वाद होत आहेत. त्यासाठी बाहेरुन शहरात येणा-या नागरिकांबाबत  नियमावली जाहीर करुन त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत नगरसेविका चिंचवडे-पाटील यांनी  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारपासून देशभरात चौथा लॉकडाउन सुरु झाला आहे. परंतु, या कालावधीत शहरातून आपल्या मूळगावी गेलेले अनेक नागरिक परत शहरात येत आहेत. शहरातील उद्योग 33 टक्के कामगारांच्या उपस्थितीत काही प्रमाणात सुरु झाले आहेत. व्यवसायांमुळे शहरामध्ये येणा-या नागरीकांची संख्या वाढत आहे.

काही नागरिक रीतसर परवानगी घेऊन येत आहेत. तर, अनेक नागरिक विनापरवाना लपून-छपून देखील शहरात येत असल्याची चर्चा नागरीकांमध्ये आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बाहेरून आलेल्या नागरीकांबरोबर वाद होत आहेत. नागरिकांमध्ये समज-गैरसमज, वाद-विवाद होऊ नयेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरीता प्रशासनाने दक्षता घेण्यासाची आवश्यकता आहे.

त्यासाठी महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि  पोलीस विभागाने समन्वयाने नियमावली करावी.  त्याचे जाहीर प्रगटन प्रसिद्ध करावे आणि त्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी नगरसेविका चिंचवडे यांनी निवेदनातून केली आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.