Pimpri : टाक्यांच्या स्ट्रक्चरल ऑडीटचे काम थेट पद्धतीने

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने थेट पद्धतीने शहरातील जुन्या पाण्याच्या टाक्या आणि संपासाठी सल्लागार नेमून स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा रक्कम 44 लाख 91 हजार रूपये दराने थेट पद्धतीने काम देण्यात येणार आहे.

पिंपरी – चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 20 लाखाच्या पुढे पोहोचली आहे. शहराला पाणीपुरवठा पवना नदीतून केला जातो. पवना नदीतून पाणी बंद पाईपलाईनद्वारे निगडी – सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी शहरातील विविध टाक्यांमधून बंद पाईपलाईनद्वारे पुरविले जाते. सध्या शहरात प्रति व्यक्ती प्रति दिवस 150  लिटर पाण्याची गरज भासते. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ठिकठिकाणी 27 पंप हाऊस केंद्र आहेत. जमिनीअंतर्गत असणा-या पाण्याच्या टाक्यांची संख्या 17 आहे. तर, उंचावरील पाण्याच्या टाक्या 85 आहेत.

शहरात जुन्या पाण्याच्या टाक्यांची संख्या जास्त आहे. या टाक्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे गरजेचे असते. त्यासाठी शहरातील सर्व जुन्या टाक्या आणि संपावर सल्लागार नेमण्याचा आणि या टाक्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार, महापालिका पाणीपुरवठा विभागाने या कामासाठी के. बी. पी. इंजिनिअरींग सव्र्हीसेस या ठेकेदाराची थेट पद्धतीने नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना 44 लाख 91 हजार रूपये दराने काम देण्यात येणार आहे. त्यांच्या दर स्विकृतीस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 21 डिसेंबर 2018 रोजी मान्यता दिली. त्यानुसार, त्यांच्याशी करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.