-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari: सुप्त गुण ओळखून स्वतःला घडवा! – विनय सातपुते

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुण ओळखून स्वतःला घडवावे, असे मार्गदर्शनपर आवाहन लायन्स क्लब ‌इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय व्याख्याते विनय सातपुते यांनी भोसरी येथील महात्मा फुले विद्यालयात बोलताना केले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड विभाग) आणि लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान, कविसंमेलन आणि साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे उद्घाटन करताना सातपुते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड विभाग) अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, लायन्स क्लब भोजापूर गोल्डचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मुकुंद आवटे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महात्मा फुले विद्यालयाचे अध्यक्ष नीळकंठ लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

विनय सातपुते म्हणाले की, दैनंदिनी लिहिण्याची सवय लावून घेतली, की आपल्या व्यक्तिमत्त्वाचा कल कळतो. त्यानंतर जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेण्याची तयारी असल्यास अनेक क्षेत्रांत खूप संधी उपलब्ध आहेत. महात्मा गांधींच्या तीन माकडांचा संदेश अभिनव पद्धतीने आचरणात आणून चांगले वाचणे, चांगले ऐकणे आणि चांगले बोलणे यातून उत्तुंग व्यक्तिमत्त्वे घडू शकतील!

यावेळी पंतप्रधान श्रमश्री पुरस्कार विजेते बाजीराव सातपुते यांनी ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार – यशवंतराव’ या विषयावर व्याख्यान देताना यशवंतराव चव्हाण यांचे बालपण, स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग, सहकार चळवळीसह आधुनिक महाराष्ट्राची उभारणी, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रांतील योगदान, तळागाळातील कार्यकर्त्यांविषयी स्नेहभाव, मातृभक्ती, पत्नी वेणूताईंची सहजीवनातील उत्कट साथ अशा विविध पैलूंची अतिशय मोजक्या शब्दांत मांडणी करीत, “प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून कसे कृतार्थ जगावे, हे कळण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांचे जीवनचरित्र समजून घेतले पाहिजे!” असे प्रतिपादन केले.

त्यानंतर ‘घर अंधारते तेव्हा…’ या कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या कविता आणि लेखिका डॉ. नयनचंद्र सरस्वते यांचे ललितलेखन यांतून सिद्ध झालेल्या साहित्यकृतीला मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. उत्तरादाखल चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या पहाडी आवाजातून ‘माणूस माझं नाव गड्या रं…’ या आणि अन्य कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी ‘सह्याद्रीच्या पाऊलखुणा’ कविसंमेलनात कवी राजेंद्र वाघ यांच्या सूत्रसंचालनाखाली सुरेश कंक, संगीता झिंजुरके, प्रदीप गांधलीकर, मधुश्री ओव्हाळ, सुभाष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचे विविध रंग साकार करणाऱ्या कवितांचे सादरीकरण करून बालमित्रांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

मुरलीधर साठे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “विद्यार्थीदशेतच आपले ध्येय निश्चित केल्यास तुमच्यातून नवे यशवंतराव निर्माण होतील!” असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी नितीन देशमुख लिखित यशवंतराव चव्हाण यांच्यावरील गीताचे राजेंद्र वाघ यांनी गायन केले.

पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. अरुण गराडे यांनी आभार मानले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक राष्ट्रगीताने सांगता झाली. महात्मा फुले विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn