Pimpri : महिलांनी कुटीरउद्योग व्यवसायातून विकास साधावा – कविता बहल

एमपीसी न्यूज – जगात जपान पाठोपाठ आपल्या भारतात गुजरातने कुटीरोद्योग क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली असून त्या धर्तीवर महिलांनीही या व्यवसायाकडे छोटे स्वरूपात न पाहता त्याप्रमाण उद्योगास सुरूवात करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांनी आज येथे व्यक्त केले.

संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सभागृहात श्री जगद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सावित्री जिजाऊ आत्मनिर्भर महिला पुरस्कार संत तुकारामनगर भागात बचत गट चळवळीच्या पाया रोवणाऱ्या सुलभा यादव यांना आज प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप होतं.

  • श्रीमती यादव या गेली ३२ वर्षे पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक कार्य करीत असून त्यांनी १५ बचत गटांची स्थापना केलेली आहे. तसेच गुजरात आणि किल्लारी येथे झालेल्या भुकंपामध्ये पुनर्वसनासाठी मदत कार्य उभारले आहे. मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, संगिता सुवर्णा, मुख्य संयोजिका ॲड. सुनिता रानवडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सुलक्षणा धर होत्या.

व्यक्तिमत्वाचा आणि कुटुंबाचा विकास घरात राहूनच पूर्ण करता येतो, याचे उदाहरण कुटीरोद्योगातून प्रगतीकडे झाल्याचा इतिहास आहे. त्याचा लाभ या भागातील महिलांनी घ्यावा, असे श्रीमती बहल यांनी यावेळी म्हटले आहे.

  • मुख्य संयोजिका ॲड. सुनिता रानवडे यांनी आपल्या मनोगतात, महिलांनी कुटीरोद्योग करण्यासाठी प्रस्ताव आणला तर सर्व प्रकारचे सहकार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाईल, अशी जाहीर घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी प्रकाश जाधव, सुलक्षणा धर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी केले. तर आभार सचिन दाभाडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी चांदभाई शेख, ॲड. सुनिल रानवडे, देवेंद्र गावंडे, आरती सौदे, विकास शिंदे, शकुंतला कनोजिया, ॲड. पुरब डोळस यांनी पुढाकार घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.