Pimpri: राष्ट्रवादीची दुसरी यादी; पिंपरीतून सुलक्षणा धर यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे. पिंपरी मतदारसंघातून नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या शुक्रवारी (दि. 4) त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रवादीकडून पिंपरीतून लढण्यासाठी नगरसेविका सुलक्षणा धर -शिलवंत यांच्यासह माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, गोरक्ष लोखंडे, गायक डॉ. उत्कर्ष शिंदे इच्छुक होते. त्यामध्ये धर यांना उमेदवारी मिळविण्यात यश आले आहे.

संत तुकारामनगर प्रभागातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर धर नगरसेविका म्हणून महापालिकेत निवडून आल्या आहेत. पहिल्यांदाच त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. उच्चशिक्षित आहेत. आता त्यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली आहे.

उमेदवारी मिळाल्यानंतर सुलक्षणा धर-शिलवंत म्हणाल्या, “पक्षाचे अध्यक्ष, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी मनापासून आभार मानते. माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला पक्षाने संधी दिली आहे. उमेदवारीसाठी स्पर्धा असताना पक्षाने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. पक्षाने टाकलेला विश्वास आणि दिलेल्या संधीचे नक्कीच चांगल्या पद्धतीने सोने करणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.