Pimpri : आलटून-पालटून तेच ठेकेदार; पाण्याच्या टाक्या उभारण्याच्या 202 कोटींच्या कंत्राटातही ‘रिंग’?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाई, उद्यान देखभालीच्या निविदेत रिंग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता आंद्रा-भामा आसखेड धरणातून 100 एमएलडी पाणी आणण्याच्या प्रकल्पाअंतर्गत काढलेल्या जलवाहिनी आणि पाण्याच्या टाक्या उभारण्याच्या 202 कोटी रुपयांच्या कंत्राटातही ‘रिंग’ झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. चार पॅकेजेससाठी मोजक्याच ठेकेदारांनी आलटून-पालटून सहभाग घेतल्याचे तांत्रिक छाननीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे निविदामध्ये रिंग होत असताना हर्डीकर प्रशासन काय करत आहे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी महापालिकेमार्फत चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आणि पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत आंद्रा धरणातून थेट पाईपलाईन द्वारे पाणी आणण्यास कालावधी लागण्याची शक्यता असल्याने देहू, बोडकेवाडी बंधा-याजवळ 100 दशलक्ष लिटर क्षमतेचे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे आणि चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत रायझिंग मेन टाकण्याचा पर्याय पाटबंधारे विभागाकडून सुचविण्यात आला आहे. शहरात नव्याने विकसित होणा-या चिखली, च-होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरासाठी या पाण्याचा वापर होणार आहे.

महापालिकेने आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या कामासाठी नागपूरस्थित ‘डीआरए कन्सल्टंट’ यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. शहराच्या विविध भागात 27 पाण्याच्या टाक्या बांधणे आणि 55 किलोमीटर अंतरावर जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा आराखडा सल्लागाराने तयार केला आहे. 4 पॅकेजेस निश्चित करत 201 कोटी 52 लाख 65 हजार 323 रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता घेऊन या कामाची निविदा 18 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या निविदेचा तांत्रिक लिफाफा 31 जानेवारी 2020 रोजी उघडण्यात आला. त्यात ठेकेदारांनी ‘रिंग’ केल्याचे सकृतदर्शनी पुढे आले आहे.

48 कोटी 34 लाख 71 हजार रूपयांच्या पहिल्या पॅकेजमध्ये आठ ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यात डुडूळगाव, च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, प्राईड सिटी या भागांचा समावेश आहे. या पहिल्या पॅकेजमध्ये गुडविल कन्स्ट्रक्शन, इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी, मेसर्स पी. एल. अडके, परफेक्ट इंजिनिअरींग असोसिएटस, पी. बी. गोगाड, एस. एस. साठे आणि सुरेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड यांनी सहभाग घेतला आहे. या सातही निविदा तांत्रिक छाननीत पात्र ठरल्या आहेत.

45 कोटी 86 लाख 80 हजार रूपयांच्या दुस-या पॅकेजमध्ये तीन ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यात मोशी आणि चिखलीचा समावेश आहे. या निविदा प्रक्रीयेत गुडविल कन्स्ट्रक्शन, पी. बी. गोगाड, एस. एस. साठे, एस. बी. खाकाल आणि ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला.

55 कोटी 52 लाख 88 हजार रूपयांच्या तिस-या पॅकेजमध्ये सात ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यात लक्ष्मणनगर, थेरगाव गावठाण, नवीन संत तुकारामनगर, बो-हाडेवाडी, चिखली आदींचा समावेश आहे. या निविदा प्रक्रियेत तीन ठेकेदारांनी भाग घेतला आहे. त्यात मेसर्स आर. बी. कृष्णानी, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन आणि शिवरत्न कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड अर्थमुव्हर्स यांचा समावेश आहे.

51 कोटी 78 लाख 25 हजार रूपयांच्या चौथ्या पॅकेजमध्ये आठ ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यात ताथवडे, पुनावळे, किवळे, लक्ष्मणनगर आदी भागांचा समावेश आहे. या पॅकेज फोरच्या निविदा प्रक्रीयेत तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यात एस. एस. साठे, इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी आणि परफेक्ट इंजिनिअरींग असोसिएटस यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.