Pimpri: नगरसेवकाशी उद्धट वर्तन करणा-या लिपिकाचे निलबंन रद्द; एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखली

एमपीसी न्यूज – मद्यप्राशन करुन नगरसेवकाशी अरेरावी, उद्धट भाषेत संवाद साधून गैरवर्तन करणा-या पिंपरी महापालिकेच्या एका लिपिकाचे सेवानिलंबन रद्द करण्यात आले आहे. तर, एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई मागे घेतली आहे.

विनोद तानाजी शिंदे असे सेवानिलंबन रद्द केलेल्या लिपिकाचे नाव आहे. शिंदे मुख्य लिपिक या गट ‘क’ दर्जाच्या पदावर वायसीएमएच रुग्णालयात कार्यरत आहेत. केसपेपर बनविणे, वैद्यकीय स्वरुपाचे दाखले देण्याचे काम त्यांच्याकडे होते. 11 मार्च 2019 रोजी रात्रपाळीमध्ये शिंदे हे मद्यप्राशन करुन कर्तव्यावर हजर होते. महापालिकेचे एक नगरसेवक नातेवाईकाचा स्मशान दाखला घेण्याकरिता वायसीएमएचमध्ये आले होते. शिंदे यांनी त्यांच्याशी अरेरावी, शाब्दीक स्वरुपाची बाचाबाची करुन उद्धट भाषेत संवाद साधून गैरवर्तन केल्याने त्यांना निलंबित करुन खातेनिहाय चौकशी सुरु केली होती.

नगरसेवकाच्या तक्रारीच्या अनुषंगाने वायसीएमच्या अधिष्ठतांनी चौकशी केली. शिंदे यांनी 11 मार्च रोजी कर्तव्यावर असताना मद्याच्या अंमलाखाली राहुन गंभीर गैरवर्तन केल्याचा निष्कर्ष समितीने नोंदविला. त्यावर शिंदे यांनी दोषारोप मान्य करत यापुढे अशा प्रकारचे गैरवर्तन घडणार नाही, याची ग्वाही देत खुलासा विचारात घेण्याची विनंती केली. विभागीय चौकशी नियमपुस्तिका 1991 मधील नियम 6,10 नुसार शासकीय कर्मचा-यांनी दोषारोप कबूल केले. तर, पुढे चौकशीची गरज राहत नाही, असे स्पष्ट केले आहे.

विभागप्रमुखांनी शिंदे यांच्यावर शास्ती कारवाई करण्याची स्पष्ट शिफारस केली आहे. परंतु, दोषारोप मान्य केल्याने शिंदे यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. निलंबन कालावधी कर्तव्यावर व्यतित केलेला कालावधी न मानता विनावेतनी करण्यात आला आहे. त्यांची एक वेतनवाढ कायस्वरुपी रोखून ठेवण्यात आली आहे. तसेच शिंदे यांनी तत्काळ रुजू होऊन अहवाल सादर करावा. यापुढे कोणत्याही प्रकारच्या कार्यालयीन कामकाजामध्ये गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.