Pimpri : अपहार केलेल्या लिपिकाचे सेवानिलबंन रद्द

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील जलतरण तलावातील तिकीट विक्रीत गोलमाल करुन अपहरण केलेल्या लिपिकाचे सेवानिलंबन रद्द करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.

किरण शाम भोईर असे सेवानिलंबन रद्द केलेल्या लिपिकाचे नाव आहे. महापालिकेच्या सभांजीनगर येथील साई अँक्वामरिन जलतरण तलावावरील व्यवस्थापकीय कामकाज भोईर यांच्याकडे सोपविण्यात आले होते. विभागप्रमुखांनी 30 जानेवारी 2019 रोजी तलावाची तपासणी केली. त्यावेळी तलावात 14 नागरिक पोहण्याचा लाभ घेत होते. त्यापैकी सहा पासधारक वगळता आठ गेस्ट तिकीट विक्री होणे आवश्यक होते. मात्र, फक्त चारच तिकीट विक्री झाल्याचे निदर्शनास आल्याने आणि चार तिकीटावर दिनांक व वेळेचे शिक्के मारले नसल्याचे उघडकीस आले. महापालिकेचे आर्थिक नुकसान, अपहार केल्याने भोईर यांना निलंबीत करुन त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली होती.

निलंबन आढावा समितीने किरण भोईर यांचे सेवानिलंबन रद्द करुन त्यांची खातेनिहाय चौकशीची कार्यवाही पुढे सुरु ठेवण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भोईर यांचे निलंबन रद्द केले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी पुढे सुरु ठेवण्यात आली आहे. चौकशीअंती निलंबन कालावधीचा निर्णय घेण्यात येईल. भोईर यांची क्रीडा विभागामधून इ क्षेत्रीय कार्यालय विभागात स्थानांतरण करण्यात आली आहे. त्यांना आर्थिक स्वरुपाशी संबंधित कामकाज सोपविण्यात येऊ नये. त्यांच्या सेवा पुस्तकात याची नोंद केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.