Pimpri: ‘तबलीगी जमात’शी संबंधित ‘त्या’ रुग्णांचा 14 दिवसांनंतरचा रिपोर्टही ‘पॉझिटीव्ह’

आणखी एकजण पॉझिटीव्ह; सक्रिय रुग्णांची संख्या 35  

एमपीसी न्यूज – दिल्लीतील तबलीगी जमातच्या कार्यक्रमातून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाने 14 दिवसांचे उपचार घेतल्यानंतरही त्याचे दुसरे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता मात्र वाढली आहे. तसेच भोसरी परिसरातील आणखी एका पुरुष रुग्णाचे रिपोर्ट रात्री उशिरा पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 35 वर पोहचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील 48 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलीगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या  23 आणि त्यांच्या संपर्कातील पाच नातेवाईक अशा 28 जणांपैकी 2 जणांचे रिपोर्ट 2 एप्रिल रोजी ‘पॉझिटीव्ह’ आले होते. त्यानंतर त्यांच्या  हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिक कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.

यातील एक रुग्ण दक्षिण आफ्रिका, दिल्ली, मुंबईमार्गे पुणे असा प्रवास करुन आला होता. त्यानंतर या रुग्णाने शहरातील थेरगाव, खराळवाडी भागात प्रवास केला होता. या कोरोनाबाधित रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराला 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले. परंतु, दुस-या चाचणीतही हा रुग्ण पुन्हा पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये भोसरी परिसरातील आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील हा रुग्ण आहे. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 35 वर पोहचली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 48 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 35 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 31 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, चार सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि.9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.