Pimpri : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तहसील कार्यालयात ‘तहसील हेल्प डेस्क’

पूरग्रस्तांना मदत करू इच्छिणा-या पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांनी 'तहसील हेल्प डेस्क'शी संपर्क करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात ‘तहसील हेल्प डेस्क’ सुरु करण्यात आला आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयापासून पुणे जिल्ह्यातून येणारी संपूर्ण मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना मदत करायची आहे. पण वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने मदत करता येत नाही. अशा नागरिकांसाठी तहसील हेल्प डेस्क काम करणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी दिलेली मदत एकत्रित करून तहसील हेल्प डेस्कच्या वाहनातून पुणे विभागीय आयक्त कार्यालयापर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी ‘तहसील हेल्प डेस्क’शी संपर्क करावा, असे आवाहन तहसीलदार गीता गायकवाड यांनी केले आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे हजारो संसार उघड्यावर आले आहेत. लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. अनेक लहान मुले, गरोदर माता, वृद्धांची प्रचंड मोठी तारांबळ उडाली आहे. या पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी राज्यभरासह देशभरातून अनेक हात उंचावले. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी देखील पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, असे अनेक लोक आहेत. ज्यांना मदत करायची आहे. पण समन्वय नसल्याने मदत करता येत नाही. केवळ वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने मदत पोहोच करणे शक्य नसते. या परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी तहसील कार्यालयाकडून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील सहृदय नागरिकांनी तहसील हेल्प डेस्कशी संपर्क करावा. त्यानंतर तहसील कार्यालयाचे वाहन मदत करणा-या नागरिकांच्या ठिकाणापर्यंत जाऊन मदत जमा करेल. ही मदत पिंपरी-चिंचवड शहरातून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत नेली जाईल. तिथून पुढे जिल्हास्तरीय समन्वयक मदत पुढे पूरग्रस्त भागात पाठवणार आहेत. अन्नधान्य, बिस्कीट, फरसाण, सॅनिटरी नॅपकिन, कपडे आणि दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तू नागरिकांना देता येणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी तहसीलदार गीता गायकवाड (9404939919), नायब तहसीलदार विकी परदेशी (8888826811) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

‘तहसील हेल्प डेस्क’ चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहे. रात्री अपरात्री देखील मदत पाठवायची असल्यास लँडलाईन क्रमांकावर (020-27642233) संपर्क करावा, असेही सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.