Pimpri: शैक्षणिक शुल्क वाढ करणाऱ्या संस्थावर कारवाई करा- संकेत चोंधे

Pimpri: Take action against institutions that increase tuition fees demand by bjym president Sanket Chonde कोरोना सारख्या भयानक परिस्थितीत सर्वांची आर्थिक स्थिती चांगली नसताना फी वाढ करणे आणि त्यासाठी पालकांना सक्ती करणे अन्यायकारक आहे.

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने यंदा कोणतीही शैक्षणिक शुल्क वाढ न करण्याची सूचना शाळा व शैक्षणिक संस्थांना दिली आहे. मात्र, काही शैक्षणिक संस्थानी याकडे दुर्लक्ष करत भरमसाठ शुल्क वाढ केली असून ते भरण्यासाठी पालकांकडे रेटा लावला आहे.

सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अशा शैक्षणिक संस्थावर कारवाई करण्याची मागणी भाजयुमोचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी केली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या या मागणीत संकेत चोंधे यांनी असे म्हटले आहे की, शैक्षणिक संस्थांनी शुल्क वाढ करू नये असे आदेश असताना बहुतांश सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांनी नियम पायदळी तुडवत मागील वर्षीपेक्षा ज्यास्त शुल्क वाढ करत सक्तीची शुल्क वसुली सुरू केली आहे.

कोरोना सारख्या भयानक परिस्थितीत सर्वांची आर्थिक स्थिती चांगली नसताना फी वाढ करणे आणि त्यासाठी पालकांना सक्ती करणे अन्यायकारक आहे.

शैक्षणिक संस्था फी भरण्यासाठी सक्ती करत आहेत व जे पालक वाढीव शुल्क भरण्यास विरोध करत आहेत त्यांना ऑनलाइन वर्गाची लिंक न पुरवणे, तसेच त्यांच्या पाल्याची शैक्षणिक वर्षातून नावे वगळणे असे प्रकार केले जात आहेत.

याप्रकरणी सरकारने त्वरीत लक्ष घालून भरमसाठ शुल्क वाढ करणाऱ्या शैक्षणिक संस्थावर कारवाई करावी, अशी मागणी संकेत चोंधे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.